मलबार हिलला ठाकरे बंधूंपुढे भाजपच्या गडाचे आव्हान; हायप्रोफाइल मतदारसंघात कसोटी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:31 IST2025-12-25T10:30:48+5:302025-12-25T10:31:05+5:30
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेली काही वर्षे या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले आहे. आता पालिका निवडणुकीत मलबार हिलमधील प्रमुख लढत भाजप विरुद्ध उद्धवसेना-मनसे युती अशी असेल. काँग्रेसचा प्रभाव येथे सातत्याने कमी झाला आहे.

मलबार हिलला ठाकरे बंधूंपुढे भाजपच्या गडाचे आव्हान; हायप्रोफाइल मतदारसंघात कसोटी लागणार
- सुजित महामुलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. मुंबईतील या हायप्रोफाइल मतदारसंघात २१४, २१५, २१७, २१८ आणि २१९ हे पाच प्रभाग गेल्या निवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाखाली होते. त्यामुळे हा परिसर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान ठाकरे बंधूंसमोर असणार आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेली काही वर्षे या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले आहे. आता पालिका निवडणुकीत मलबार हिलमधील प्रमुख लढत भाजप विरुद्ध उद्धवसेना-मनसे युती अशी असेल. काँग्रेसचा प्रभाव येथे सातत्याने कमी झाला आहे.
भाजपकडे मजबूत संघटनात्मक रचना, आर्थिक संसाधने आणि तसेच बिगर मराठी आणि व्यापारी वर्गाची भक्कम साथ आहे. दुसरीकडे, ठाकरे
बंधू मराठी मतांचे ध्रुवीकरण करून आणि स्थानिक नागरी प्रश्नांवर भर देत भाजपला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष म्हणजे, गिरगावसारख्या मराठी प्रभाव असणाऱ्या प्रभागातही भाजपच्या अनुराधा पोतदार यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनल जुवाटकर यांचा पराभव केला होता.
पाच प्रभागांमध्ये २.६१ लाख मतदार
मलबार हिल हा देशातील सर्वाधिक श्रीमंत नागरिकांचा मतदारसंघ आहे. महापालिकेच्या पाच प्रभागांत सुमारे २.६१ लाख मतदार आहेत. गिरगाव, ताडदेव आणि ग्रँट रोडच्या काही भागांत मराठी मते निर्णायक ठरू शकतात.
२०१७ मध्ये एकसंघ शिवसेनेलाही येथे फक्त एकच प्रभाग जिंकता आला होता. त्यामुळे यावेळी ठाकरे बंधूंची युती भाजपच्या बालेकिल्ल्यात कितपत जम बसवते, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
गुजराती, राजस्थानी मतदार टक्का अधिक
२१५ प्रभाग वगळता अन्य चारही प्रभागांत गुजराती आणि राजस्थानी मतदारांचा टक्का अधिक आहे. २१४ क्रमाकांच्या प्रभागातून भाजपच्या सरिता पाटील यांनी १३,८५९ मते मिळवत पाच हजारांहून अधिक मताधिक्य घेतले आणि पूर्वाश्रमीचे भाजपचे नगरसेवक आणि एकसंघ शिवसेनेचे उमेदवार अरविंद बने यांचा पराभव केला होता.
२१५ या एकमेव मराठीबहुल प्रभागात तेव्हाच्या शिवसेनेच्या अरुंधती दुधवडकर यांनी भाजपच्या श्वेता मांजरेकर यांचा जवळपास १,४०० मतांनी पराभव केला.