Mumbai Crime :मुंबईच्या मलबार हिल परिसरात हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. मलबार हिलमध्ये एका पतीने पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. दागिन्यांवरून झालेला वाद आणि चारित्र्यावरील संशयावरून ही झाल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
योगिता सुमीत वेदवंशी (२५) आणि तिचा पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी (३०) हे मलबार हिलच्या शिवाजी नगर येथील कंबाला हिल हायस्कूलजवळ राहत होते. बुधवारी त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. रागाच्या भरात सुमीतने टॉवेलने योगिताचा गळा आवळला. यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर सुमीतने तिला एलिझाबेथ रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर योगिताला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि योगिताची आई लक्ष्मी सुरेश नाडल (४५) यांचा जबाब नोंदवलाय. लक्ष्मी सुरेश नाडल यांनी सुमितवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. लक्ष्मी यांनी सांगितले की सुमितने योगिताचे दागिने यापूर्वी अभिषेक नावाच्या मित्राला दिले होते आणि त्यांच्यात सतत भांडणे होत होती. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. खुनाच्या दिवशीही असाच वाद झाला आणि सुमीतने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली व त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळला.
दरम्यान, लक्ष्मी नाडल यांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुमितला घरीच अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. मलबार हिल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.