Join us  

महिलांचा बेस्ट प्रवास मोफत करा; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 12:46 AM

मुंबईच्या बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करतात़ यापैकी महिला प्रवाशांची संख्या सात लाखांहून अधिक आहे़

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनाबेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवास जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे़ मात्र सत्ताधारी शिवसेना आणि पालिकेतील विरोधी पक्षाने ही मागणी धुडकावून लावली आहे़ बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असताना भाजपची ही मागणी निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप इतर राजकीय पक्षांनी केला आहे़

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे ३४ लाख प्रवासी प्रवास करतात़ यामध्ये दररोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्याही सात लाखांहून अधिक आहे़ बेस्ट उपक्रमामार्फत सध्या शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते़ याचा आर्थिक भार बेस्ट उपक्रम उचलत आहे़ मात्र आर्थिक संकटात असल्यामुळे ही सवलत देणेही बेस्ट उपक्रमासाठी डोईजड ठरू लागले आहे़ अशावेळी भाजपच्या नगरसेविका संगीता शर्मा यांनी, बेस्ट बसमधून महिलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे़ दिल्ली वाहतूक महामंडळाने आॅक्टोबर २०१९ पासून महिलांसाठी प्रवास मोफत केला आहे़ याच धर्तीवर मुंबईतही महिलांचा प्रवास मोफत करण्याचे त्यांनी सुचविले आहे़ महापालिका आणि राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने अशी मागणी करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची खेळी भाजपने केल्याचे बोलले जात आहे़सध्या बेस्ट उपक्रमामार्फत ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, विकलांग प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवासी भाडे आकारण्यात येते़ मात्र महिला प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे़ बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असताना अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे राजकीय स्टंटबाजीच बोलावे लागेल़ काहीतरी करून दाखविण्यासाठी भाजपची ही धावपळ सुरू आहे़ मात्र त्यांची ही मागणी मान्य केली जाणार नाही़ - विशाखा राऊत (सभागृह नेत्या, मुंबई महापालिका)सात लाख महिला प्रवासी

मुंबईच्या बसगाड्यांमधून दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करतात़ यापैकी महिला प्रवाशांची संख्या सात लाखांहून अधिक आहे़७ जुलै २०१९ पासून बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाड्यात मोठी कपात केली आहे़ किमान पाच ते २० रुपये प्रवासी भाडे आहे़भाडेकपात केल्यामुळे प्रवासी संख्या १७ लाखांवरून ३४ लाखांवर पोहोचली आहे़ मात्र उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे़भाजप सत्तेवर असताना त्यांनी महिलांचा प्रवास मोफत का नाही केला? महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद मिळविता न आल्यामुळे भाजप नगरसेवक सैरभैर झाले आहेत़ म्हणूनच आता अशा मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत़ अशा मागण्यांना काही अर्थ नाही़- रवी राजा (विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका)

टॅग्स :बेस्टभाजपामहिला