सिनेट बैठकीचा कालावधी दोन दिवसांचा करा, पत्राद्वारे युवा सेनेची कुलगुरूंकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:55 IST2025-03-18T13:55:15+5:302025-03-18T13:55:45+5:30
गेल्या अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाची सिनेट अस्तित्वात नव्हती. परिणामी, यंदा होणाऱ्या अर्थसंकल्पीय सिनेटमध्ये दोन वर्षांनी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सिनेट बैठकीचा कालावधी दोन दिवसांचा करा, पत्राद्वारे युवा सेनेची कुलगुरूंकडे मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाने अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीचा कालावधी एक दिवस केला आहे. त्याला विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. तसेच हा कालावधी आणखी एक दिवसाने वाढविण्याची मागणी संघटना करीत आहेत. त्याबाबतचे पत्र युवा सेनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना दिले आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाची सिनेट अस्तित्वात नव्हती. परिणामी, यंदा होणाऱ्या अर्थसंकल्पीय सिनेटमध्ये दोन वर्षांनी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सिनेटमध्ये मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प २२ मार्चला सादर केला जाणार आहे. दरवर्षी ही सिनेट बैठक किमान दोन दिवसांची असते. मात्र, यंदा विद्यापीठाने ही बैठक एका दिवसाची ठेवली आहे. त्याबद्दल विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२०१० पासून सिनेट बैठक दोन दिवस आयोजित केली जात होती. त्यामुळे अर्थसंकल्पावर साधकबाधक चर्चा होण्याबरोबरच या तरतुदींवर विचार मांडण्याची आणि आवश्यक ते बदल सुचविण्याची पुरेशी संधी सिनेट सदस्यांना मिळत होती, असे युवा सेनेने पत्रात म्हटले आहे.
बैठकीचे थेट प्रक्षेपण करा
सिनेट निवडणुकांना दोन वर्षे विलंब झाल्यामुळे आधीच सिनेट सदस्यांचा कामाचा कालावधी दोन वर्षे कमी झाला आहे. हा कालावधी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे या बैठकीचा कालावधी राज्यपालांकडून आणखी एक दिवस वाढवून घ्यावा.
तसेच या बैठकीचे राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाप्रमाणे थेट प्रक्षेपण करावे. असे केल्याने सिनेटच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, असे युवा सेनेच्या नेत्या आणि मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य शीतल शेठ देवरूखकर यांनी पत्रात म्हटले आहे.