पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 07:09 IST2025-08-15T07:07:39+5:302025-08-15T07:09:10+5:30
नवीन वाहन खरेदी करताना रोड टॅक्सवर १५ टक्के सवलत मिळणार आहे.

पीयूसी, इन्शुरन्स नसले तरी नो टेन्शन; १५ वर्षे जुनी वाहने स्क्रॅप करता येणार
मुंबई : राज्यात १५ वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता पीयूसी, इन्शुरन्स, ग्रीन टॅक्स किंवा फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही अशी वाहने स्क्रॅप करता येणार आहेत. यासह ग्रीन टॅक्सवरील व्याज, रोड टॅक्सवरील व्याज यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, प्रलंबित रोड टॅक्स आणि ई-चलन भरल्याशिवाय वाहन स्क्रॅप करता येणार नाही तसेच वाहन स्क्रैप केल्यानंतर, नवीन वाहन खरेदी करताना रोड टॅक्सवर १५ टक्के सवलत मिळणार आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने नवीन वाहनांच्या तुलनेत दहापट जास्त प्रदूषण करतात. त्यामुळे अशी जुनी वाहने हटवणे आवश्यक आहे. यासाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्यात आली. या पॉलिसीनुसार वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने अनेकांना स्क्रॅपिंग प्रक्रियेत अडथळे येत होते. आता परिवहन विभागाच्या नव्या परिपत्रकामुळे ही अडचण दूर झाली आहे. नागरिकांना फक्त प्रलंबित रोडटॅक्स व ई-चलनाची रक्कम भरावी लागणार आहे.
लवकरच आणखी पाच केंद्रे
सध्या राज्यात एकूण आठ स्क्रॅपिंग केंद्रे कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १७ हजार शासकीय आणि २,७०० खासगी वाहनांचे स्क्रॅपिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय नागरिकांना अधिक सोयीसाठी आणखी पाच केंद्रे सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या केंद्रांवर वाहनांची नोंदणी रद्द करण्यापासून ते स्क्रॅप सर्टिफिकेट मिळविण्यापर्यंत सर्व प्रक्रिया एका ठिकाणी पूर्ण करता येणार आहे.