बीएमसीत मोठी प्रशासकीय फेरबदल; पालिकेतील ५ सहायक आयुक्तांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:41 IST2025-10-04T12:41:17+5:302025-10-04T12:41:48+5:30
मुंबई महापालिकेतील पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या.

बीएमसीत मोठी प्रशासकीय फेरबदल; पालिकेतील ५ सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी नितीन शुक्ला आणि अलका ससाणे यांच्या बदल्या काही महिन्यांपूर्वीच झाल्या होत्या. अल्पावधीत त्यांची पुन्हा बदली झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘बी’ वॉर्डाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांची के-पूर्व विभागात बदली झाली आहे, तर ‘एस’ वॉर्डाच्या सहायक आयुक्त ससाणे यांची बदली बाजार विभागाचे सहायक आयुक्त म्हणून झाली आहे. ‘सी’ वॉर्डाचे संजय इंगळे यांची बदली नगर अभियंता विभागात झाली आहे. ‘एफ-दक्षिण’ वॉर्डाचे रमेश पाटील यांची ‘एस’ वॉर्डात आणि‘आर- दक्षिण’ वॉर्डाचे मनीष साळवे यांची बदली नगर अभियंता विभागात झाली आहे.
चार जणांची नियुक्ती
पालिकेतील ‘सहायक आयुक्त’ संवर्गातील रिक्त पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेअंती शिफारस केलेल्या चार सहायक आयुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश आयुक्त भूषण गगराणी यांनी काढले आहेत.
त्यानुसार संतोष साळुंके यांची ‘सी’ वॉर्ड, वृषाली इंगुले यांची ‘एफ दक्षिण’, योगेश देसाई यांची ‘बी’ वॉर्ड आणि आरती गोळेकर यांची ‘आर दक्षिण’ वॉर्डच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१४ जणांची शिफारस
सहायक आयुक्त संवर्गात १४ उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आली होती. यापैकी सहा उमेदवारांची यापूर्वीच सहायक आयुक्त पदावर पदस्थापना केली आहे. तर, शुक्रवारी आणखी चौघांना सेवेत घेण्यात आले. उर्वरित चौघांपैकी एकास पूर्वीच्या कार्यसंस्थेने अद्याप कार्यमुक्त झालेला नाही. तर एक उमेदवार प्रसूती रजेवर आहेत. दोन उमेदवार प्रशिक्षण घेत असून, ते पूर्ण झाल्यानंतर त्यांची नेमणूक होईल.
सहायक आयुक्तांसारखे महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त ठेवणे सयुक्तिक होत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत रिक्त असलेल्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार प्रशासकीय निकड व निर्णयानुसार उपप्रमुख अभियंता कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.