Join us

माहुलच्या घरांची विक्री रखडलेलीच, ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता : निवृत्त कर्मचाऱ्यांनाही अर्ज करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:25 IST

घरांसाठी अर्ज करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनीदेखील ही घरे नाकारली आहेत. त्यामुळे ८,७६८ हून अधिक घरे पडून आहेत. अल्पप्रतिसादामुळे या घरांचे करायचे काय, असा पेच पालिकेपुढे आहे. वर्ग १ अधिकारी वगळून इतर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना या घरांसाठी संधी दिली होती.

मुंबई : माहुल येथील घरांसाठी महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहे. मात्र, याआधी विक्री झालेल्या घरांचे पैसे रखडले आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा घरांच्या विक्रीप्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. एकूणच घरांची विक्री प्रक्रिया रखडली आहे.

माहुलमधील सदनिका पालिका कर्मचाऱ्यांना १२ लाख ६० हजार रुपयांत मालकी तत्त्वावर विकण्यात येत आहेत. त्याकरिता गेल्या १५ मार्चपासून ९,०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अंतिम मुदतीपर्यंत फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केली. सोडत काढून २१ जूनला घरांचे दिली जाणार होती. मात्र, ३३० पैकी ५० कर्मचाऱ्यांनीच घरांची रक्कम भरली. त्यामुळे पुन्हा ३० जुलैपर्यंत मुदत वाढवली. मात्र, तरीही ५३ कर्मचाऱ्यांनी अनामत रक्कम भरली.

घरांसाठी अर्ज करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनीदेखील ही घरे नाकारली आहेत. त्यामुळे ८,७६८ हून अधिक घरे पडून आहेत. अल्पप्रतिसादामुळे या घरांचे करायचे काय, असा पेच पालिकेपुढे आहे. वर्ग १ अधिकारी वगळून इतर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना या घरांसाठी संधी दिली होती.  ५३ अर्जदारांनी ७२ घरांसाठी भरली अनामत रक्कम

५३ अर्जदारांनी ७२ घरांसाठी अनामत रक्कम भरल्याने त्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे मुदत वाढवूनही या घरांकडे कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ज्यांची मुंबईत घरे नाहीत, अशा पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही घरांची विक्री केली जाणार आहे.

त्याकरिता प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असली तरी आधीच्या कर्मचाऱ्यांचे पैसे रखडल्याने पुढची ही प्रक्रिया रखडली आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनमुंबई