Diwali 2025: माहीमच्या स्वदेशी कंदिलांनी उजळणार मुंबईची घरटी; घरगुती कंदील निर्मितीला वेग, परदेशातूनही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:55 IST2025-10-07T09:54:53+5:302025-10-07T09:55:01+5:30
Mumbai Diwali 2025 Lantern: महागाई वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत कंदील निर्मितीचा खर्च वाढला आहे. कंदील बनवण्यासाठी लागणारा कापड, कागद, पुठ्ठा, बांबू, कटिंग करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींच्या खर्चात वाढ झाल्याने कंदिलाच्या विक्री किमतीत गेल्यावर्षीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती कंदील उत्पादकांनी दिली.

Diwali 2025: माहीमच्या स्वदेशी कंदिलांनी उजळणार मुंबईची घरटी; घरगुती कंदील निर्मितीला वेग, परदेशातूनही मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दसरा सरताच आता सगळ्यांना दिवाळीचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कंदील निर्मितीला वेग आला आहे. चिनी कंदिलांपेक्षा हाताने बनवलेल्या स्वदेशी कंदिलांना मागणी असून, ग्राहक माहीम येथील कंदील उत्पादकांकडे आतापासून ऑर्डर नोंदवत आहेत. यंदा कंदिलांचे दर किमान ६० रुपयांपासून ते एक हजार २०० रुपयांपर्यंत आहेत.
महागाई वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत कंदील निर्मितीचा खर्च वाढला आहे. कंदील बनवण्यासाठी लागणारा कापड, कागद, पुठ्ठा, बांबू, कटिंग करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींच्या खर्चात वाढ झाल्याने कंदिलाच्या विक्री किमतीत गेल्यावर्षीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती कंदील उत्पादकांनी दिली.
घरगुती कंदिलांना ग्राहकांची पहिली पसंती आहे. ग्राहक घरी येऊन कंदील खरेदी करतात, अनेकदा आगाऊ ऑर्डर नोंदवत आहेत, अशी माहिती गेल्या २० वर्षांपासून कंदील बनविणाऱ्या शलाका राऊत यांनी दिली. ग्राहक अनेकदा परदेशातही जाताना सोबत आम्ही बनवलेले कंदील घेऊन जातात. अनेक ग्राहक घरांसाठी लहान कंदील खरेदी करतात, असे त्या म्हणाल्या.
सोसायट्यांकडून मोठ्या कंदिलांची ऑर्डर
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोठ्या आकाराचे, त्यांच्या पसंतीचे आकाश कंदील लावण्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी ऑर्डर देतात. त्यानुसार कंदील तयार केले जातात, असे राऊत म्हणाल्या.
एक फूट उंचीच्या कंदिलासाठी गेल्यावर्षी एक हजार रुपये आकारले जात होते, यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे, मात्र ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात कंदिलांची ऑर्डर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमचे कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून कंदील निर्मिती करत आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर कामाला वेग येतो. महिना ते दीड महिना हे काम वेगात सुरू असते. लहानपणी आवड म्हणून कंदील बनवत होतो. ग्राहकांना हॅण्डमेड कंदील आवडतात.
- नितेश फापाले, कंदील उत्पादक