लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दहिसर (पूर्व) येथील दहीहंडी सराव दुर्घटनेतील मृत महेश जाधव याच्या कुटुंबाला मदतीचा ५ लाखांचा धनादेश शनिवारी देण्यात आला. नवतरुण मित्रमंडळ गोपाळकाला पथकातील ११ वर्षीय महेशचा सरावादरम्यान सहाव्या थरावरून पडून मृत्यू झाला होता.
तारामती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बोरिवली पूर्व, देवीपाडा आयोजित दहीहंडी उत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महेश याची आई संगीता जाधव यांना हा धनादेश देण्यात आला. शिंदेसेनेचे मागाठाणेचे आ. प्रकाश सुर्वे यांनी ही मदत दिली. यावेळी महेशचे वडील, तीन छोटी भावंडे उपस्थित होती.
महेशची आई घरकाम, तर वडील मजुरी करतात. मात्र, त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँकेत खाते नव्हते. त्यामुळे संगीता यांच्या खात्यात धनादेश जमा करण्यासाठी अडचणी होत्या. आता त्यांचे नवीन आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती आ. सुर्वे यांनी दिली.