पश्चिम उपनगरात महायुतीचे आव्हान; १०२ पैकी निम्म्या प्रभागात भाजपची आघाडी; मिश्र प्रभागात काँग्रेसचे अस्तित्व टिकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:27 IST2025-12-24T09:26:41+5:302025-12-24T09:27:51+5:30
पश्चिम उपनगरात मुस्लिम व मिश्र प्रभागात काँग्रेसने अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व अजित पवार गट या दोन्ही गटांची ताकद मर्यादित असल्याने त्यांना युतीशिवाय आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करणे कठीण जाणार आहे.

पश्चिम उपनगरात महायुतीचे आव्हान; १०२ पैकी निम्म्या प्रभागात भाजपची आघाडी; मिश्र प्रभागात काँग्रेसचे अस्तित्व टिकून
- महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पश्चिम उपनगरातील १६ विधानसभा मतदारसंघातील आमदार, माजी नगरसेवक व भाषिक मतदारांचे गणित पाहता मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतील भाजप हाच पक्ष प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. पश्चिम उपनगरात उद्धवसेनेचे पाच आमदार असले तरी १०२ पैकी भाजपकडे ५१ तर शिंदेसेनेकडे २० माजी नगरसेवक आहेत. या तुलनेत उद्धवसेनेची ताकद कमी आहे, तर मनसे शून्यावर असल्याने ठाकरे बंधूंसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे.
पश्चिम उपनगरात मुस्लिम व मिश्र प्रभागात काँग्रेसने अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व अजित पवार गट या दोन्ही गटांची ताकद मर्यादित असल्याने त्यांना युतीशिवाय आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करणे कठीण जाणार आहे. बोरीवली, दहिसर, कांदिवली, गोरेगाव, वर्सोवा आणि वांद्रे (पश्चिम) या सहा विधानसभेत उद्धवसेनेचा एकही माजी नगरसेवक नाही. तर, अन्य १० विधानसभेत एक, दोन माजी नगरसेवकांच्या बळावर उद्धवसेना टिकून राहिली आहे. बोरीवली, कांदिवली, चारकोप, विलेपार्ले, वांद्रे (पश्चिम) येथे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. मराठीबहुल प्रभागांची संख्या पश्चिम उपनगरात अधिक असतानाही मराठी मतांचे विभाजन झाल्याचा फायदा भाजप व शिंदेसेनेलाच मिळत असल्याचे
चित्र आहे.
२०१७ मध्ये नगरसेवक किती?
भाजप ५०
एकसंघ शिवसेना ३३
काँग्रेस १३
अपक्ष ३
राष्ट्रवादी काँग्रेस २
एमआयएम १
सध्या कोणाचे किती माजी नगरसेवक?
भाजप ५१
शिंदेसेना २०
उद्धवसेना १५
काँग्रेस ११
राष्ट्रवादी १
एमआयएम १