'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:06 IST2025-10-11T17:04:13+5:302025-10-11T17:06:53+5:30
कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन मुनींकडून मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा घेतली. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवीन पक्षाची घोषणा केली.

'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
Shantidoot Jankalyan Party BMC Election: "कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं होतं. कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल", असा इशारा देत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णयानंतर मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी मुंबई जैनधर्मिय मुनीनी धर्मसभा आयोजित केली होती. या सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नव्या पक्षाचे नाव जाहीर केले, तसेच आम्ही मुंबई महापालिका निवडणूक लढवणार आहोत, अशी घोषणाही केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईत माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, "सरकारला माझा इशारा नाहीये, तर सनातन धर्माचा आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाहीये. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी कबुतरांचा प्रश्न निर्माण केला आहे."
महापालिका निवडणूक लढवणार
"आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. जैन धर्मीय लोक सर्वाधिक टॅक्स भरतात. आता आमचाही पक्ष असेल. आम्ही देखील महापालिका निवडणुकीत लढवू. आम्ही आमचे वाघ उभे करू. कबुतरांची पार्टी पाहिजे. बाळासाहेबांनीही वाघाच्या नावाने पक्ष स्थापन केला होता. शिवसेनेचाही वाघ होता", असे जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले.
"शांतीदूत जनकल्याण पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कबुतर आमचे पक्षचिन्ह असेल. ही फक्त जैनांची पार्टी नसेल, ही गुजराती, मारवाडी, तसेच चादर आणि फादर सोडून सगळ्यांची असेल. सगळ्यांना पक्षात प्रवेश असेल", असे जैन मुनी निलेशचंद्र यांनी सांगितले.
मनीषा कायंदेवर नाव न घेता टीका
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी कबुतराखान्यांच्याा मुद्द्यावर भूमिका मांडली होती. त्याबद्दल जैन मुनींना प्रश्न विचारण्यात आला. जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले की, मी कोणत्याही पक्षाचा प्रचारक नाहीये. मी जैन मुनी आहे. ज्या ज्या लोकांचा कबुतरखान्यांना विरोध आहे. त्यांना माझा विरोध आहे. माझ्या कोणत्याही पक्षाला विरोध नाही. त्या ताई म्हणतात की, नागाला दूध पाजण्याची परंपरा बंद केली. आताही ग्रामीण भागात लोक सापाला दूध पाजतात. तुम्ही जर पाजत नसाल, तर तो तुमचा धर्म आहे. पक्षाला दाणे टाकणे आमचा धर्म आहे. आम्ही आमचा धर्म कधीच विसरणार नाही. मरेपर्यंत विसरणार नाही."