Mahavikas Aghadi will fight the Mumbai Municipal Corporation elections together, sanjay raut | मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

ठळक मुद्देआगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत राऊत यांनी केलंय.

मुंबई - शिवसेनेच्या स्थापनेपासून पहल्यांदाच शिवसैनिकांच्या गर्दीशिवाय यंदाचा दसरा मेळावा पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा आहे. त्यामुळे, शिवसेनेसाठी आजचा दसरा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे. कोरोनाचं संकट नसतं तर आज शिवतीर्थावर महापूर आला असता, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दसरा मेळाव्यासंदर्भात बोलताना, आगामी महापालिका निवडणुकांवरही संजय राऊत यांनी भाष्य केलंय. 

आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत खासदार राऊत यांनी केलंय. अनेकजण म्हटले होते की, 11 दिवसांत सरकार पडेल. गणपतीला सरकारचे विसर्जन होईल, पण आता दसरा आला आहे. आमच्याकडे सर्व तयारी झाली आहे, आता त्यांच्याच खाली बॉम्ब फुटतील, असे म्हणत भाजपाला इशारा दिला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी एकत्र असेल, असे भाकीत राऊत यांनी केलंय. 

मुख्यमंत्र्यांनी सीमोल्लंघनाची तयारी केली असून आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतील, असं राऊत यांनी म्हटलं. राज्यात कोरोनाचं संकट असताना शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्यानं भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली. त्या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'जनाची आणि मनाची कोणी कोणाची काढायची? विरोधकांची ही टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनाही लागू पडते का? कारण सरसंघचालकांनीदेखील आज मेळावा घेतला. आम्ही त्यांचा आदर करतो,' असं राऊत म्हणाले.

मोदींच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं काय?

आम्हाला जनाची, मनाची आहे म्हणूनच शिवतीर्थावर होणारा भव्य मेळावा सावरकर सभागृहात घेत आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी हजारोंची गर्दी असलेल्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये घेत आहेत. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर टीका करत असाल, तर मोदींच्या सभांचं काय? तिथे जनाची, मनाची, तनाची, धनाची बाळगली जात नाही, अशा तिखट शब्दांत राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

फडणवीसांच्या प्रकृतीसाठी जगदंबेचरणी प्रार्थना

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं दौरे करत आहोत. त्यांना काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. शासकीय रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.

प्रत्येकाला लस मोफत मिळावी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काही दिवसांपूर्वीच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात बिहारमधील जनतेला कोरोनाची लस फुकट देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे. त्यावर राऊत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. प्रत्येकाला लस मोफत मिळावी ही आमचीही इच्छा आहे. मात्र, आमचे मुख्यमंत्री कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत, असा चिमटा राऊत यांनी काढला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahavikas Aghadi will fight the Mumbai Municipal Corporation elections together, sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.