Join us  

'मविआ'ची यादी खोळंबली! आंबेडकरांचा आमच्यासोबत संवाद सुरू, यादी उद्या जाहीर होणार; संजय राऊतांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 5:16 PM

Sanjay Raut : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. पण, जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

Sanjay Raut ( Marathi News ) :महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. पण, जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर वंचित बहुजन आघाडीला जागा सोडण्यावरुन चर्चा सुरू आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी काल आघाडी तोडल्याचा राऊतांनी आरोप केला होता. दरम्यान, आता महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार असून वंचित बहुजन आघाडीसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

Breaking: मोठी बातमी! महाराष्ट्रातील अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; हायकोर्टाचा निर्णय

"शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही, उमेदवारांना सूचना दिल्या जातात. आता महाविकास आघाडीत असल्यामुळे आणि मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करणार आहे. शिवसेनेचे जवळपास सर्वच उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेसमध्येही उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवार निश्चित झाले आहेत. उद्या महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

"महाविकास आघाडीमध्ये एखाद्या जागेवरुन संघर्ष,तणाव असं काही नाही. वंचित आघाडी आजही महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. प्रकाश आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही वारंवार संवाद ठेवला आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप करताना मागे, पुढे होतं. वंचितला चार जागांचा प्रस्ताव मान्य नाही, आता आम्ही पुन्हा त्यांच्यासोबत चर्चा करुन मार्ग काढणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

हातकणंगले मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार?

संजय राऊत म्हणाले, हातकणंगले ही जागा शिवसेनेची आहे. २०१९ ला शिवसेनेचा उमेदवार जिंकला आहे. त्या जागेवर काय करायचं हे महाविकास आघाडीतील पक्षांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे. जयंत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, ते तेथील आढावा घेत आहेत. सांगलीची जागा शिवसेना लढणार आहे, भिवंडीतील जागेवर चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही कोणताही प्लॅन बी ठेवलेला नाही, देशातील हुकूमशाही संपवायची आहे, असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे जागावाटप हे महाराष्ट्रातच होते, आम्हाला जागावाटपासाठी दिल्लीला जावे लागत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.    

टॅग्स :शिवसेनामहाविकास आघाडीभाजपाशरद पवार