मुंबई-
सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत १ हजार ३५६ आजारांवर मोफत उपचार केले जातात. १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आळी आहे. या योजनेत उपचारासाठी निवडलेल्या रुग्णालयांमध्ये खासगी, विश्वस्त संस्थांची रुग्णालये तसेच सर्व सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरातील ४९ रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार दिले जातात. त्यामुळे सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना ही योजना खुली झाली असून आता ५ लाखांपर्यंतच्या उपचारांचा खर्च मोफत केला जाणार असल्याची माहिती विभागातर्फे स्पष्ट करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत पूर्वी प्रति कुटुंब दीड लाख रुपयेपर्यंतचे उपचार मोफत मिळत होते. आता रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. त्यातील साडेतीन लाख रुपयांचा भार राज्य शासन, तर दीड लाखांचा खर्च विमा कंपनी करतात. सुधारित महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांना शस्त्रक्रियांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे रुग्णालयांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्य रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने मोफत उपचार केले जात आहेत. तसेच ही आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमधून ९९६ आजारांवर उपचार करण्यात येतात. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमधून १२०९ आजारांवर उपचार होतात. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या शस्त्रक्रियांच्या खर्चात वाढ देण्यास मंजुरी- मूत्रपिंड शस्त्रक्रिया- जुने दर २.५ लाख रुपये- नवीन दर ४.५० लाख- बायपास शस्त्रक्रिया- जुने दर एक लाख रुपये- नवीन दर १ लाख २५ हजार - हृदयाचा झडपा बदलणे- जुने दर १ लाख २० हजार रुपये- नवीन दर १ लाख ४५ हजार रुपये- किडनी स्टोन- जुने दर ३० हजार रुपये- नवीन दर ४० हजार रुपये
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील १८१ उपचार वगळून मागणी असलेल्या नव्या ३२८ उपचारांचा समावेश केला गेला आहे. तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये आणखी १४७ आजार वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे आता एकूण उपचार संख्या ही १३५६ इतकी झाली आहे.