Join us  

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यातील आरोग्य विभाग सज्ज, सर्व शासकीय रुग्णालयांत विलगीकरण कक्षाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:49 PM

कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

मुंबई - कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ खाटा उपलब्ध आहेत. सध्या राज्यात चार जण निरीक्षणाखाली असून प्रत्येकी २ जण मुंबई आणि पुणे येथे भरती आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दि.१४ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३१ हजार ९३४ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १८६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १२५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.  दि.१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४८ जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी ४७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होईल.  आजवर भरती झालेल्या ४८ प्रवाशांपैकी ४४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोनामहाराष्ट्र सरकारआरोग्य