महाराष्ट्र दिनी निघणार ५० हजार कामगारांचा एल्गार मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:52 IST2018-04-27T00:52:11+5:302018-04-27T00:52:11+5:30
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे निमित्त साधत १ मे रोजी आझाद मैदानावर सुमारे ५० हजार कामगार धडक देतील

महाराष्ट्र दिनी निघणार ५० हजार कामगारांचा एल्गार मार्च
मुंबई : कामगार कायद्यांत कामगारविरोधी बदल आणि किमान वेतनाची मागणी करत सर्वपक्षीय कामगार संघटनांनी सरकारविरोधात एल्गार मार्चची हाक दिली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे निमित्त साधत १ मे रोजी आझाद मैदानावर सुमारे ५० हजार कामगार धडक देतील, असा दावा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीने सरकारवर आगपाखड केली.
कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी म्हणाले की, नाशिकमधील राज्य परिषदेत कामगारांचा एल्गार मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या एल्गार मोर्चामध्ये संघटित व असंघटित कामगारांच्या विविध संघटना सामील होणार आहेत. मात्र भाजपा प्रणीत भारतीय मजदूर संघाने या मोर्चातून अंग काढून घेतले आहे. तरीही या एल्गार मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हजर राहून कामगारांना सामाजिक सुरक्षेचे आश्वासन द्यावे. नाहीतर आगामी निवडणुकीत सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यास कामगार भाग पाडतील, असा इशाराही उटगी यांनी या वेळी दिला.