एक-दोन नाही, महाराष्ट्राला मिळणार तब्बल ७ वंदे भारत एक्स्प्रेस? ‘हे’ मार्ग आहेत प्रस्तावित!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:44 AM2024-01-16T11:44:21+5:302024-01-16T11:45:04+5:30

Vande Bharat Express Train: देशभरात ४१ वंदे भारत ट्रेन सुरू असून, महाराष्ट्राला आणखी सात वंदे भारत लवकरच मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.

maharashtra will get as many as 7 vande bharat express train soon these ways are proposed | एक-दोन नाही, महाराष्ट्राला मिळणार तब्बल ७ वंदे भारत एक्स्प्रेस? ‘हे’ मार्ग आहेत प्रस्तावित!

एक-दोन नाही, महाराष्ट्राला मिळणार तब्बल ७ वंदे भारत एक्स्प्रेस? ‘हे’ मार्ग आहेत प्रस्तावित!

Vande Bharat Express Train: रेल्वे प्रवाशांना गतिवान आणि आरामदायी सेवा देणारी सेमी हायस्पीड रेल्वेसेवा म्हणून 'वंदे भारत'कडे पाहिले जाते. आताच्या घडीला देशभरात ४१ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सेवेत आहेत. आगामी काही दिवसांत आणखी अनेक मार्गांवर नवीन वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास सात वंदे भारत एक्स्प्रेस सेवेत आहेत. यात आता आणखी सात वंदे भारत ट्रेन सुरू करण्याबाबत विचार आहे. काही मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून मिळून सात वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा सुरू आहे. जवळपास या सर्व मार्गांवरील सेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सात मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसपैकी २ ट्रेन १६ डब्यांच्या असून, बाकी सर्व ट्रेन ८ डब्यांच्या आहेत. मुंबई सेंट्रल-गांधीनगर, नागपूर-बिलासपूर, मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-मडगाव, नागपूर-इंदूर आणि मुंबई-जालना या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत.

‘हे’ मार्ग आहेत प्रस्तावित!

महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर, मुंबई-अहमदाबाद, मुंबई सीएसएमटी-शेगाव, पुणे-शेगाव, पुणे-बेळगाव, पुणे-बडोदा, पुणे-सिकंदराबाद, मुंबई एलटीटी-कोल्हापूर या सात मार्गांवर वंदे भारत ट्रेन प्रस्तावित आहेत. राज्यात सुरू असलेल्या बहुतांश मार्गांवरील वंदे भारत एक्स्प्रेसचे भारमान ९० टक्क्यांहून अधिक असल्याचे म्हटले आहे. दररोज सरासरी ३४ हजार प्रवासी १२० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या 'वंदे भारत'चा लाभ घेत आहेत. पुढील काही वर्षांत लातूर येथेही 'वंदे भारत'ची निर्मिती केली जाणार आहे.

दरम्यान, १५ नोव्हेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या 'वंदे भारत' रेल्वेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. 'वंदे भारत'ची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत केली जाते. 

 

Read in English

Web Title: maharashtra will get as many as 7 vande bharat express train soon these ways are proposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.