मुंबई : भाजपचे १२२ आणि नव्याने पक्षात आलेले आमदार यांची एकूण संख्याच १३६च्या घरात जात आहे. त्या जागा आमच्याकडे राखणे क्रमप्राप्त आहे. त्या व्यतिरिक्त ज्या जागा भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत आणि जिथे योग्य उमेदवारही आहेत अशा जागा जोडल्या, तर आम्हाला जादा जागा लागतील, आमची ही ओढाताण लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनाचा मोठेपणा दाखवतील आणि त्यातून निश्चित तोडगा निघेल, असा दृढ विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संपादकीय विभागाशी मनमोकळी चर्चा केली. युतीची बोलणी सुरू असून, अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होईल. युतीचा फॉर्म्युला आम्ही संयुक्त पत्रपरिषदेत लवकरात लवकर जाहीर करू, असे त्यांनी सांगितले.युती होणार नाही, असे बोलले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, युती शंभर टक्के होणार. मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षांचीही युतीचीच इच्छा आहे. त्यामुळे युती नक्की होणार. दोघांनी मिळून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे पक्षातील लोक नाराज आहेत, असे बोलले जाते. त्यांची नाराजी कशी दूर करणार, यावर ते म्हणाले की, पक्षसंघटना, आमदार, खासदार, मंत्रिमंडळ, महामंडळं यात आम्ही मूळ पक्षनेत्यांनाच संधी दिली. विधानसभेत जिथे भाजपकडे पक्के विजयी होणारे उमेदवार आधीच आहेत, त्या ठिकाणी आम्ही इन्कमिंग होऊ दिलेले नाही. राहिला प्रश्न नाराजीचा! प्रत्येकाला आपणच निवडून येऊ असे वाटत असते पण, पक्षांतर्गत सर्वेक्षण, त्यातून आलेले निष्कर्ष, स्थानिक नेत्यांची मते विचारात घेऊनच उमेदवारी निश्चित केली जाते.काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी कोणाचे अधिक आव्हान आपल्याला दिसते या प्रश्नात ते म्हणाले की दोघेही आज प्रभावहिन झालेले आहेत. काँग्रेस नेतृत्वहीन आहे. राष्ट्रवादीत शरद पवार नेते आहेत पण त्यांचे फारसे कोणी ऐकताना दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कसे आणि किती लढतील हे मी सांगण्याची गरज नाही. दोघांना मिळून ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत.
Vidhan Sabha 2019 : आमची ओढाताण समजून उद्धवजी मोठेपणा दाखवतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:33 IST