Join us  

Vidhan Sabha 2019: कुलाब्यातील कमळाच्या गोटात अनिश्चितता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 1:28 AM

युतीच्या गोटातील अनिश्चिततेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

- गौरीशंकर घाळे मुंबई : युतीच्या जागावाटपात कुलाबा मतदारसंघ भाजपकडे राहणार की शिवसेनेच्या वाट्याला जाणार, विद्यमान आमदारांनाच परत संधी मिळणार की नवा चेहरा दिला जाणार, अशा चर्चांना कुलाब्यातील राजकीय वर्तुळात सध्या उधाण आले आहे. आघाडीच्या संभाव्य उमेदवाराने वर्षभरापासूनच तयारीला सुरुवात केली असताना, युतीच्या गोटातील अनिश्चिततेमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचे चित्र या मतदारसंघात आहे.मुंबईच्या दक्षिण टोकावरचा हा मतदारसंघ एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७८ साली जनता पार्टीच्या आमदाराने थेट २०१४ सालीच बिगर काँग्रेसी आमदाराने इथे विजय मिळविले. मोदी लाटेत भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज पुरोहित येथून निवडून आले. चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले पुरोहित पहिल्या युती सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते. पाच वर्षांनंतर मतदारसंघातील राजकीय गणिते पार बदलून गेली आहेत. भाजप, शिवसेनेच्या गोटात मात्र अद्याप अनिश्चिततेचे वातावरण आहे. दक्षिण मुंबईतील ही जागा आपल्याला सोडावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. आपला दावा मजबूत करण्यासाठी शिवसेनेने माजी नगरसेवक पांडुरंग सकपाळ यांना तयारीला लागण्याचे संकेतही दिले होते. शिवसेनेला खरेच हा मतदारसंघ हवा आहे की नेहमीचे दबावतंत्र, असा प्रश्न सुरुवातीला केला जात होता. आता निवडणुकीला एक महिनाही उरलेला नसताना उमेदवाराबाबत स्पष्ट संकेत नसल्याने भाजप कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राज पुरोहित विविध कारणांनी चर्चेत राहिले. युती सरकारमधले मंत्री फडणवीस सरकारच्या काळात फक्त आमदारच राहिले. तसेच मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचा दावा करणारा राज पुरोहित यांचा एक व्हिडीओ स्टिंग आॅपरेशनद्वारे बाहेर काढण्यात आला, तेव्हा भाजप नेत्यांना बचावाची भूमिका घ्यावी लागली होती. स्थानिक भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांसोबतच्या राजकीय संघर्षाच्या बातम्या आल्या. नार्वेकर यांनी परस्पर केलेल्या बॅनरबाजीविरोधात पुरोहितांनी जाहीर आक्षेप घेतला होता. अद्याप पुरोहित विरुद्ध नार्वेकर असा संघर्ष सुरूच आहे. पुरोहितांच्या जागेवर नार्वेकरांनी दावेदारी ठोकली आहे. त्यासाठी त्यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे. भाई जगतापांच्या मराठी कार्डला नार्वेकर उत्तर असू शकतील, असा दावा नार्वेकर समर्थकांकडून केला जात आहे.बालेकिल्ला परत मिळवण्यास कसली कंबर!एकीकडे काँग्रेसने आपला बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेतील काँग्रेस आमदार भाई जगताप यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सुमारे वर्षभरापासूनच भाई जगताप मतदारसंघात कामाला लागले आहेत. एरवी उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पाहायला मिळणारा गोंधळ कुलाब्यात तरी नाही. भाई जगतापांच्या उमेदवारीचा घोषणा ही केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेना