Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:02 PM2019-09-25T23:02:25+5:302019-09-25T23:02:36+5:30

संभ्रमाचे वातावरण : काँग्रेस, शिवसेनेकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा नाही

Maharashtra Vidhan Sabha 2019 MIM leads the announcement of candidates in Bandra East | Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी

Vidhan Sabha 2019: वांद्रे पूर्वमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमची आघाडी

Next

- खलील गिरकर 

मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी उमेदवारी मिळेल, असा आत्मविश्वास दाखवत प्रचाराला प्रारंभ केला आहे. कॉंग्रेस व शिवसेनेकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसताना एमआयएमने उमेदवाराची घोषणा करुन उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.

एमआयएमने सलीम कुरेशी यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. सध्या कुरेशी यांच्या पत्नी गुलनाज कुरेशी वांद्रे पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९२ च्या विद्यमान नगरसेविका आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने एमआयएमने या मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची २३ हजार ९७६ मते मिळाली होती. आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत १५ हजार ५० मते मिळाली होती. शिवसेना व कॉंग्रेसच्या लढाईत अल्पसंख्याक समाज आपल्या पाठीशी उभा राहील व एमआयएमला त्याचा लाभ होईल, असा विश्वास कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेच्या युतीची घोषणा अद्याप झालेली नसल्याने व कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरुन संभ्रम आहे. विधानसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाºया एकमेव महिला आमदार असलेल्या तृप्ती सावंत यांच्या समोर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आव्हान आहे. दिवंगत बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने व अल्पसंख्याक समाजामधून त्यांना पाठिंबा मिळत असल्याने उमेदवारी पुन्हा मिळेल, असा विश्वास सावंत यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर महापौर पद भूषवत असल्याने आपला विजय होईल, असा महाडेश्वर यांचा होरा आहे. शिवसेनेत ‘मातोश्री’वरुन अंतिम आदेश येत असल्याने उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ््यात पडेल याबाबत अद्याप साशंकता आहे. त्याचा परिणाम प्रचारावर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 MIM leads the announcement of candidates in Bandra East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.