Join us  

Vidhan Sabha 2019: शिवसेना पदाधिकारी, नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची उद्या मुंबईत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 7:49 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील महत्वाचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांची बैठक शनिवारी 28 सप्टेंबरला मुंबईत बोलाविली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार आहे. 

दरम्यान, राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. भाजपने १४४ पैकी १00 उमेदवारांची नावेही निश्चित केली असून, ती २९ सप्टेंबर रोजी वा त्यानंतर घोषित केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रदेश भाजपचे संघटन सचिव विजय पुराणिक यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, सरोज पांडे आदी केंद्रीय नेत्यांशी शिवसेनेला सोडावयाच्या जागा व संभाव्य उमेदवारांची नावे यावर प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्याचे भाजपने नक्की केल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती या मित्रपक्षांना मिळून १८ जागा सोडण्यावरही यावेळी एकमत झाले.

या फॉर्म्युल्यास शिवसेनेची तयारी नसल्यास भाजपने सर्व २८८ जागा लढवाव्यात, असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पण मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना १२६ जागांवर तयार होईल, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटत असून, त्यामुळे युती होण्यात अडचणी नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण १२६ पेक्षा अधिक जागा शिवसेनेसाठी सोडू नयेत, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची झालेली अडचण यांमुळे आपण स्वबळावरही बहुमत मिळवू शकतो, अशी भाजप नेत्यांची खात्री आहे. तरीही सन्मानपूर्वक तोडगा म्हणून शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले, असे सांगण्यात आले. भाजपाच्या या फॉर्म्युल्यावर अद्याप शिवसेनेकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. त्यामुळे उद्या रंगशारदा येथे होणाऱ्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. युती झाली तर इच्छुक उमेदवारांची नाराजी कशी दूर करणार हादेखील शिवसेनेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.  

टॅग्स :शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019