Join us  

Vidhan Sabha 2019: मुंबईतील 'या' मतदारसंघातील तिकिटाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी; सोनिया गांधींकडे मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 11:27 AM

तिकीटासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस

- मनोहर कुंभेजकरमुंबई: आगामी विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा, काँग्रेसचं तगडं आव्हान आहे. ईडी नाट्यामुळे राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झालं आहे. मात्र काँग्रेसला मरगळ आलेली आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये तिकीट मिळवण्यासाठी फारशी स्पर्धादेखील पाहायला मिळत नाही. मात्र वर्सोव्यात काँग्रेसचं तिकीट मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळेत आहे. काँग्रेसच्या प्रदेश व राष्ट्रीय निवडणूक समितीतही वर्सोव्यातील उमेदवाराचा निर्णय न होऊ शकल्यानं आता यावर राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी निर्णय घेणार आहेत. याबद्दलची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाहीर केलेल्या यादीत वर्सोवा विधानसभेतून विभागअध्यक्ष संदेश देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. तर येथून पुन्हा विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. महायुतीच्या शिवसंग्रामच्या कोट्यातून त्यांचे नाव शिवसंग्रामचे अध्यक्ष व आमदार विणायक मेटे जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वर्सोव्यातून विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी थेट दिल्लीतून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये गुरुदास कामत गटाचे महेश मलिक व माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांचा समावेश आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचे समर्थक रईस लष्करिया यांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी नगरसेवक मोहसिन हैदरदेखील तिकीट मिळावे यासाठी काँग्रेस प्रदेश नेत्यांच्या संपर्कात आहेत. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुमिता देव या भावना जैन यांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. तर पुन्हा एकदा तिकीट मिळावे म्हणून माजी आमदार बलदेव खोसा यांनी दिल्ली दरबारी मोर्चेबांधणी केली आहे.त्यामुळे येथून आता सोनिया गांधी या कोणाला तिकीट देणार याकडे इच्छुक उमेदवारांचे व येथील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019सोनिया गांधीकाँग्रेसवर्सोवा