जिंकलंस पोरी; उत्तीर्ण मुली ९६.१४ टक्के, मुले ९२.३१ टक्के, लेकी ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 07:45 IST2025-05-14T07:45:47+5:302025-05-14T07:45:47+5:30

चांद्यापासून बांद्यापर्यंतचा निकाल, गडचिरोली तळात, सिंधुदुर्ग टॉपर

maharashtra state board ssc result girls passed with 96 percent and boys with 92 percent | जिंकलंस पोरी; उत्तीर्ण मुली ९६.१४ टक्के, मुले ९२.३१ टक्के, लेकी ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर

जिंकलंस पोरी; उत्तीर्ण मुली ९६.१४ टक्के, मुले ९२.३१ टक्के, लेकी ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इयत्ता दहावीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या मुलींचे प्रमाण ९६.१४% असून मुलांच्या तुलनेत त्या ३.८३ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. इयत्ता बारावीमध्ये मुलांच्या तुलनेत ५.०७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. जिल्हानिहाय निकालाचा विचार करता इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे. लातूर विभागातील ११३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. ४५ विद्यार्थी एकट्या लातूर शहरातील आहेत.

राज्यात २८५, मुंबईत ६७विद्यार्थी काठावर पास

दहावी परीक्षेत काठावर म्हणजे ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८५ आहे. यापैकी सर्वाधिक ६७ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. त्यापाठोपाठ अनुक्रमे नागपूर ६३, पुणे ५९, छत्रपती संभाजीनगर २८, अमरावती २८, लातूर १८, कोल्हापूर १३, नाशिक येथील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात कोकण विभागातील एकही विद्यार्थी नाही. एटीकेटी मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ३९३ इतकी आहे.

७,९२४ शाळा, २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालावरून शतकी खेळी केलेल्या विद्यार्थी आणि शाळांची संख्यादेखील समाधानकारक असल्याचे दिसून येते. राज्यातील एकूण २३ हजार ४८९ पैकी ७,९२४ शाळांचा निकाल १००% लागला. त्याचबरोबर उत्तीर्ण १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थ्यांपैकी २११ विद्यार्थ्यांनी शतकी खेळी केली आहे. शंभर टक्के गुण मिळविलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील ५० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश.

कॉपीप्रकरण ३७ केंद्र दोषी, सहा एफआयआर दाखल

राज्यात एकूण नऊ विभागांमध्ये ५१३० केंद्रांपैकी ३७ केंद्र कॉपी प्रकरणात दोषी आढळली असून, या केंद्रांवर एकूण ९३ घटना घडल्याची नोंद झाली आहे. तसेच सहा एफआयआर दाखल करण्यात आले. तसेच दोषी केंद्रांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
 

Web Title: maharashtra state board ssc result girls passed with 96 percent and boys with 92 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.