Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 05:51 IST

राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आले, याचे समाधानही आज माझ्या मनात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य  आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील, हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबद्ध होऊया आणि प्रयत्नशील राहू या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी, मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सामान्यांच्या हितासाठी काम करता आले

- शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आले, याचे समाधानही आज माझ्या मनात आहे. - या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे, असेही ते म्हणाले. - समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा, यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. - तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत, असा शासनाचा मानस असून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेस्वातंत्र्य दिन