Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे अधिवेशन गुंडाळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ०४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळ सल्लागार समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.
१७ जुलैपासून राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. पावसाळी अधिवेशन हे ठरल्याप्रमाणे ४ ऑगस्टपर्यंत पूर्णवेळ चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती सल्लागार समितीकडून देण्यात आली. विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असते, अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली होती.
सल्लागार समितीच्या बैठकीत कामकाज पूर्णवेळ चालण्यावर निर्णय
विधिमंडळाच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही, पावसाळी अधिवेशन पूर्ण वेळ चालावे, अशी मागणी केली होती. बाळासाहेब थोरात ही विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही त्यांच्या भावना मांडू, त्यावर चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचे कामकाज पूर्णवेळ चालेल, याबाबत निर्णय घेण्यात आला. याबाबत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी माहिती दिली.
गिरणी कामगारांच्या आंदोलनाबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी
विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत केली.
दरम्यान, या बैठकीला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, आमदार प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, विजय ऊर्फ भाई गिरकर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे, अनिल परब, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, कपिल पाटील, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव पुष्पा दळवी आदी उपस्थित होते.