Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सर्पदंशात महाराष्ट्र देशात आघाडीवर; राज्यातील 'या' जिल्ह्यात सर्वाधिक सर्पदंश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 10:22 IST

गेल्या दोन वर्षात राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे, तर पश्चिम बंगालमध्ये १२ जिल्हे आहेत.

ठळक मुद्दे२०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण वाढले२०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात ३८ हजार ९०४ जणांना सर्पदंश झालाजागतिक सर्पदंशाच्या निम्मे मृत्यू भारतात झाले आहेत

मुंबई - संपूर्ण देशभरात महाराष्ट्र सर्पदंशात आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात २०१८-१९ मध्ये जवळपास ४२ हजारांहून अधिक सर्पदंश झाल्याचं आढळून आलं आहे. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. बंगालमध्ये ३६ हजार ८५८ सर्पदंश झाल्याची माहिती आहे. जिल्हानिहाय माहिती काढल्यास देशात नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक सर्पदंशाची प्रकरणं नाशिक जिल्ह्यात असल्याची माहिती आहे.

धारवाडच्या जेएसएस आर्थिक संशोधन संस्थेच्या प्रदीप एस साळवे, श्रीकांत वतावती आणि ज्योती हल्लाद यांनी 'एलसेव्हियर' या शैक्षणिक जर्नलमध्ये हा डेटा प्रकाशित केला होता. यासाठी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा डेटा वापरुन जिल्हास्तरीय विश्लेषण' करण्यात आलं. संशोधकांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सरकारी डेटाचा वापर सर्पदंश आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणांचा अंदाज घेण्यासाठी केला.

या अभ्यासात आढळून आले की, जागतिक सर्पदंशाच्या निम्मे मृत्यू भारतात झाले आहेत. त्यांच्या संशोधनानुसार, २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमध्ये ३२.२ लोकांना सर्पदंश झाला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६.६ लोक, तर तामिळनाडूमध्ये ३६.६ आणि गोवा ३४.५ आढळले. २०१७-१८ मध्ये महाराष्ट्रात ३८ हजार ९०४ जणांना सर्पदंश झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ३४ हजार २३९ लोकांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. 

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण वाढले असून दर एक लाख लोकसंख्येमध्ये 35 लोक सर्पदंश आणि पश्चिम बंगालमध्ये ३९.४ लोकांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्पदंशाशी संबंधित मृत्यूचे प्रमाण कमी आहे. सर्पदंश होण्याच्या घटना प्रामुख्याने दक्षिणेकडील द्वीपकल्प डेक्कन पठार भागातील जिल्ह्यांत जास्त प्रमाणात होत आहे. मात्र जिल्ह्यांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे, तर पश्चिम बंगालमध्ये १२ जिल्हे आहेत.

नाशिकमध्ये सर्वाधिक सर्पदंश सन २०१८-१९ मध्ये ४ हजार २९४ नोंदलेल्या सर्पदंश प्रकरणांमध्ये जिल्हा देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगालमधील पूर्बा मेदिनीपुरच्या तुलनेत तो मागे आहे, याठिकाणी ४ हजार ९०४ प्रकरणे आहेत. भौगोलिक स्थिती पाहिली तर नाशिक घाटात पसरलेला पश्चिम घाट आणि द्राक्ष शेती, साखर कारखाने आणि वाईनरीज वेगवेगळ्या जातींच्या सापांचे अस्तित्व वाढविण्यास अनुकूल परिस्थिती देतात, असे या अभ्यासात म्हटलं आहे. पालघरसारख्या जिल्ह्यांमध्ये ३ हजार २०४, ठाणे २ हजार ६५५, कोल्हापूर २ हजार २९८, पुणे २ हजार १०९, रत्नागिरी १ हजार ९९४ आणि जळगाव १ हजार ८४२ सर्पदंशाची प्रकरणे २०१८-१९ मध्ये नोंद झाली आहेत.  

टॅग्स :महाराष्ट्रसापपश्चिम बंगाल