मुंबई : महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. कायमस्वरूपी काहीही नसल्याने सत्तेत असणाऱ्यांचीही एक्सपायरी डेट येणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सरकारला दिला. सध्या निवडणूक हा आपला एकमेव कार्यक्रम असेल. तीन वर्षे निवडणुका नसल्याने पक्ष बांधणीला सुरुवात करा. मराठी भाषा दिन जोरात साजरा करा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
पालिका निवडणुकीतील अपयशानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाचे नगरसेवक व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. देशात दीर्घकाळ सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाचा दाखला देत ते म्हणाले, ५७-५८ वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसला कोण हरवणार असे वाटत होते. पण, त्याची आजची अवस्था पाहा. वेळ बदलते. अनेकांना जे काही चालू आहे ते कायमस्वरूपी आहे असे वाटत आहे. पण, कायमस्वरूपी काही नसते. ही फक्त सूज आली आहे. काँग्रेसवर जी परिस्थिती आली आहे तशीच आता सत्तेत असलेल्या पक्षाची देखील होणार आहे.
पुढील तीन वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्याने यापुढे आंदोलनांपेक्षा पुढील काळातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावे. हा काळ संघटनबांधणीसाठी वापरावा. आपापल्या जिल्ह्यांमध्ये कामाचे ओझे पडणार नाही यासाठी संपर्क प्रमुखांची निवड करून पक्ष विस्ताराला गती द्यावी. पक्षाची स्थापना होऊन २० वर्षे झाली आहेत. १९ मार्चला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
...तर फडणवीसांनाही भेटेन
बैठकीनंतर राज म्हणाले, मोठ्या शहरांतील पार्किंग समस्यांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आपल्याकडे पूर्वीसारखे राजकारण राहिले नाही. आता निवडणुका संपल्या. आम्हाला काही सांगायचे असेल, काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी भेट घेतलीच पाहिजे. प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नये. काल एकनाथ शिंदेंना भेटलो. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटेन.
अनेक इमारतींमध्ये पार्किंगचा मोठा मुद्दा आहे. मागे मुख्यमंत्र्यांना भेटून ही गोष्ट सांगितली असता, त्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणींना फोनकरून सांगितले होते, अशी माहितीही राज यांनी यावेळी दिली.
Web Summary : Raj Thackeray warned the government that their 'expiry date' is approaching, emphasizing party building and focusing on upcoming elections. He highlighted the need for organizational strength, referencing the Congress party's decline. Thackeray also mentioned meetings with political figures regarding urban issues like parking.
Web Summary : राज ठाकरे ने सरकार को चेतावनी दी कि उनकी 'एक्सपायरी डेट' आ रही है, पार्टी निर्माण पर जोर दिया और आगामी चुनावों पर ध्यान केंद्रित करने को कहा। उन्होंने कांग्रेस पार्टी के पतन का हवाला देते हुए संगठनात्मक शक्ति की आवश्यकता पर प्रकाश डाला। ठाकरे ने पार्किंग जैसे शहरी मुद्दों पर राजनीतिक हस्तियों के साथ बैठकों का भी उल्लेख किया।