Join us  

बालभारतीच्या पाठयपुस्तकांचे कॉपीराईट राज्य सरकार घेणार- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 1:02 PM

आतापर्यंत पाठ्यपुस्तक मंडळाच्या सात ते आठ व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे.

मुंबई: इयत्ता १० वीचे बालभारतीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-१ आणि भाग-२ ही पाठ्यपुस्तके व्हॉट्सअप वर व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची तक्रार दादर पोलीस ठाण्याच्या सायबर सेलकडे दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत पाठ्यपुस्तक मंडळाच्या सात ते आठ व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. तसेच ५ ते ६ खाजगी पुस्तक विक्रेत्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तसेच भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी बालभारतीची सर्व पुस्तके व पाठ्यपुस्तक आदी सर्व प्रकाशनाचे कॉपीराईट महाराष्ट्र शासनाकडे कायमस्वरुपी घेण्यात येणार आहेत. जेणेकरुन बालभारतीच्या कोणत्याही पाठ्युपस्तकाची विनाअनुमती कोणतेही खासगी पुस्तक विक्रेते छपाई करु शकणार नाही, असेही तावडे यांनी आज स्पष्ट केले.

राज्यातील इयत्ता दहावीचे बालभारतीचे संपूर्ण पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉटसअप वर व्हायरल झाल्याबद्दलची लक्षवेधी सूचना सुनिल प्रभू, आशिष शेलार, विजय वड्डेटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आदी सदस्यांनी उपस्थित केली होती. याला उत्तर देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गतीने तपास करण्यात येत आहे. या तपासात कोणीही व्यक्ती दोषी आढळल्यास याविरुद्ध कठोर करवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांच्यामार्फत तयार करण्यात येणाऱ्या पाठयपुस्तकांचे कॉपीराईट आता शासन आपल्याकडे घेणार आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही खासगी पुस्तक विक्रेते, गाईड विक्रेते आदींना त्या पुस्तकांची छपाई करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागेल असेही, तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :महाराष्ट्रशैक्षणिक