Join us  

Maharashtra Government : 'त्या' इशाऱ्यानंतर सोनिया गांधी नरमल्या; शिवसेनेबाबत पवारांशी बोलल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:42 AM

Maharashtra Government : शिवसेनेने भाजपसोबत राजकीय नातं न जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक साधली.

मुंबई - शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसने असमर्थता दर्शवल्यानेच सोमवारी सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिला. त्यामुळे शिवसेनेला सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह राहुल गांधी आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीतील काही नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते. त्यामुळे, काँग्रेसचे महाशिवआघाडीबाबत एकमत झाले नाही. मात्र, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना इशारा दिल्यानंतर सोनिया यांनी मवाळ भूमिका घेतल्याची माहिती आहे. 

शिवसेनेने भाजपसोबत राजकीय नातं न जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक साधली. मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा आणि शिवसेनेत सामना रंगला होता. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ठामपणे आपली भूमिका मांडताना, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवतिर्थावर शपथविधी होणार, असे म्हणत 170 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्रीपदाबाबत आमचं काहीही ठरलं नव्हतं, असे सांगत फडणवीस यांनीही सत्ता स्थापनेला संख्याबळ नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाशिवआघाडी होणार असल्याची चर्चा रंगली. 

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिल्ली दरबार गाठून राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींच्या कानावर घातली. त्यावेळी, शिवसेनेसोबत जाण्यास केंद्रातील काही नेत्यांनी विरोधही केला. मात्र, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील यांनी सोनिया गांधींना इशारच दिला. जर काँग्रेसने या संधीचा लाभ घेतला नाही, किंवा महाशिवाघाडीत सामिल न होण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात काँग्रेस भुईसपाट होईल, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगितले. तसेच, काँग्रेसच्या आमदारांनीही शिवसेनेला सोबत घेण्यास अनुकूलता दर्शवली. सोनियांची यासंदर्भात शरद पवार यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर, त्यांनी मवाळ भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांच्या या इशाऱ्यानंतर सोनिया नरमल्या, त्यानंतर केंद्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात आले. त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली आणि महाशिवआघाडीत येण्याचं निश्चित झालं. 

दरम्यान, दिल्लीतून याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे.   

टॅग्स :सोनिया गांधीशरद पवारकाँग्रेसशिवसेनाअशोक चव्हाण