Join us  

Maharashtra Government: 'मी पुन्हा येईन म्हणालो, पण टाईम नाही सांगितला त्यामुळे वाट बघा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:04 PM

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती पण काल दुर्दैवाने करता आली नाही

मुंबई -  विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. फडणवीसांचे अभिनंदन करताना सत्ताधारी नेत्यांनी कौतुक करत काही चिमटेही काढले. यावर अभिनंदनाचे ठराव चांगलेच होते, काही भाषणं अशी होती त्यामध्ये खोचक कौतुक करण्यात आलं. मी पुन्हा येईन म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा आणलं, सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिलं. पण जनादेशाचा सन्मान आपण ठेऊ शकलं नाही. लोकशाहीत अशा गोष्टी होत असतात. मी पुन्हा येईन सांगितले पण टाइमटेबल सांगितलं नव्हतं म्हणून काही वेळ वाट बघा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना टोला लगावला आहे. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची इच्छा होती पण काल दुर्दैवाने करता आली नाही, अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतोय, प्रेमाचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध राजकारणापलीकडे असतात. त्यांच्या मनात जनतेकरिता ज्या योजना केल्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे जनतेच्या हिताचं आहे त्यासाठी नक्कीच सहकार्य करु. विरोधी पक्षात काम करणं हा आमचा डीएनए आहे, नियम पुस्तिकेच्या बाहेर मी कधीच गेलो नाही, संविधानाच्या आधारे काम करतो, सभागृहात जे मुद्दे काल मांडले ते संविधानाच्या आधारे मांडले. अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करता येत नाही, पण त्यांच्या निर्णयाने समाधान झालं नाही म्हणून सभात्याग केला. नियमाचे पुस्तक आणि संविधान यापुढे जाऊन कोणताही मुद्दा रेटून नेणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास मनाई नाही, आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हेच आहेत. छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही काम केले. बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही नावं वंदनीयच आहेत. ही नावं कधीही घ्या, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात शपथ घेताना जी तरतूद केली आहे. त्या अनुसरुन शपथ घ्यायला हवी होती. पण शपथ घेताना संविधानाची तरतूद पाळली नाही.  जेव्हा जेव्हा नियमाला धरुन काम होणार नाही. कितीही चिडला, कितीही रागवला तरीही मला दिलेली जबाबदारी ही नियमाला धरुन, संविधानाला अनुसरुन काम करत राहणार आहे असं सांगत फडणवीसांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले. 

त्याचबरोबर संविधानामध्ये इतकी शक्ती आहे. त्याची ताकद खूप मोठी आहे. विरोधी पक्ष शत्रू नाही तर वैचारिक विरोध म्हणून आपणं इथं बसलो, जे मित्र होते ते एकमेकांसमोर बसले आहेत, जे विरोधात होते ते सत्तेत बसले आहेत. लोकांनी जनादेश आम्हाला देऊनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही पण ४० टक्के मार्क मिळून तिघं एकत्र आले अन् १२० टक्के सांगितले असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही कधीही आवाज द्या, आमचा प्रतिसाद सकारात्मक असेल, जनतेच्या हिताविरोधात असेल तर सरकारवर आसूड ओढण्याचं काम नक्कीच करणार आहोत असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे.    

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेविधानसभा