Join us  

पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट', जाहिरातबाजीनं गहू-तांदुळ पुरवतंय देवेंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 11:10 AM

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे.

मुंबई - कोल्हापूर अन् सांगलीतीलपूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. कोल्हापूरकरांच्या घरातील पाणी पाहून मराठीजनांचे डोळे पाणावले आहेत. आज संपूर्ण महराष्ट्र सह्याद्रीच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. सोशल मीडिया या मदतीचा माईलस्टोन ठरत असून केवळ आपली मदत पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेऊन सामाजिक संस्था, संघटना आणि नेटीझन्स पुढाकार घेत आहेत. मात्र, स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या सरकारने चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचे यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदतीवरुन सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेटीझन्सकडून सरकारला धारेवर धरले जात असून स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच, काही नेटीझन्सने फेसबुकवरुन हे फोटो शेअर करताना, सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्याही कपाळावर महाराष्ट्र सरकारतर्फे असं का लिहित नाही? असा प्रश्न विचारला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्त भागातील नागरिकांच आयुष्य या पुरामुळे उद्धवस्त झालं आहे. होत्याचं नव्हत एका रात्रीत झालंय. त्यामुळे सरकार आपल्याला मदत करेल, या अपेक्षेनं पीडित नागरिक आस लावून बसले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीतही 10 किलो तांदूळ आणि गहू देऊन सरकारतर्फे मोठी जाहिरातबाजी केली जात आहे.  दरम्यान, सरकारच्या या जाहिरातबाजीचा नेटीझन्सकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.  

टॅग्स :कोल्हापूर पूरपूरदेवेंद्र फडणवीससांगली