Join us  

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सामाजिक भान; कोरोनामुळे मुलाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 5:09 PM

maharashtra energy minister nitin raut: राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनीही सामाजिक भान राखत आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आणखी कठोर करण्यात आली आहे. विदर्भात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे विवाह समारंभाला ५० पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आदेश आता देण्यात आले आहेत. अशावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनीही सामाजिक भान राखत आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (nitin raut postpones his son marriage reception due to covid outbreak)

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांचा विवाह सोहळा १९ फेब्रुवारी रोजी झाला होता. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. पण राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नितीन राऊत यांनी आपल्या मुलाच्या विवाहाचा स्वागत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील एक ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. 

"नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता माझा मुलगा कुणाल आणि आकांक्षा यांच्या विवाहप्रित्यर्थ नागपुरात २१ फेब्रुवारी रोजी आयोजित स्वागत समारंभ तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय आम्ही राऊत कुटुंबियांनी घेतला आहे. निमंत्रितांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिर आहोत", असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. 

नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुनच मुलाचे लग्न करणार असल्याचं नितीन राऊत यांनी याआधीच सांगितलं होतं. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. पण या विवाहनिमित्त एक स्वागत समारंभ नितीन राऊत यांनी उद्या रविवारी आयोजित केला होता. सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर स्वागत समारंभ स्थगित कऱण्याचं राऊत कुटुंबियांनी जाहीर केलं आहे.

टॅग्स :नितीन राऊतकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस