Join us  

Maharashtra Election2019 : कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली 70 वर्षांत विकास झाला- अशोक गेहलोत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 8:37 PM

कॉंग्रेसने नेहमीच लोकशाही प्रक्रियेला सशक्त केलेे. कितीही राजकीय संकटे आली, सत्ता आली व गेली मात्र लोकशाही बळकट करण्याला व लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. 

मुंबई : कॉंग्रेसने नेहमीच लोकशाही प्रक्रियेला सशक्त केलेे. कितीही राजकीय संकटे आली, सत्ता आली व गेली मात्र लोकशाही बळकट करण्याला व लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. 70 वर्षांत देशात काही झाले नाही, हा भाजपचा राजकीय कांगावा आहे. स्वातंत्र मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादन होत नव्हते, कॉंग्रेसने देशाचा विकास केला. कॉंग्रेसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालण्याला महत्त्व दिलेे.  देशाचा विकास कॉंग्रेसने केला आहे. विरोधकांचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोत गेहलोत यांनी मांडली. 

धारावी मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार आमदार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी गोल्डफिल्ड सोसायटी परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते.  यावेळी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता व मोठ्या प्रमाणात राजस्थानी समाज उपस्थित होता.  गेहलोत म्हणाले,  देशातील महिलांना राजीव गांधीनी राजकीय क्षेत्रात आरक्षण दिले. मोबाईल फोन, संगणक ही राजीव गांधीची देशाला देण आहे. लोकसभेत मोदी विजयी झाले मात्र जनतेच्या विकासाच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. मोदी आता नवीन आश्वासने देत आहेभारत व पाकिस्तान एकाच वेळी स्वातंत्र्य झाले. मात्र,  भारतात संविधानावर मार्गक्रमण करुन लोकशाही प्रक्रिया कायम ठेवण्यात कॉंग्रेसने  नेहमी यश मिळवले.  कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीमध्ये कधीही लोकशाहीला कमजोर केले नाही.

एकनाथ गायकवाड म्हणाले,  केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे धारावीतील उद्योजकांचे नुकसान झाले आहे.  पाच रुपये दहा रुपये मध्ये थाळी देण्याचे आश्वासन सेना भादप देत आहे. ही मंडळी सरकार चालवणार का हॉटेल चालवणार असा प्रश्न त्यांनी विचारला. झुणका भाकर योजनेद्वारे यापूर्वी जमिनी लाटल्याचा आरोप त्यांनी केला. देशात मंदीचे वातावरण आहे खिशातील पैसा संपायला लागला आहे मात्र तरीही काही जण अजूनही मोदींचे गुणगान करत आहेत. देशात सध्या भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. सीबीआय, ईडी यांचा कसा वापर होईल सांगता येत नाही. मात्र अंतिम विजय सत्याचाच होतो हे अटळ आहे. ही परिस्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019