Join us  

Maharashtra Government: राष्ट्रपती राजवटीविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार; कपिल सिब्बल मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 2:22 PM

दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. पंतप्रधान ब्राझील दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे.

मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते अन् ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा वाद सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला निमंत्रण पाठविले पण या तिन्ही पक्षांना सरकार बनविण्यात अपयश येत असल्याचं लक्षात घेऊन राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली आहे अशा संदर्भात इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी बातमी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेला आहे. त्यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. पंतप्रधान ब्राझील दौऱ्यावर जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविली आहे. त्यामुळे या बैठकीला राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला मान्यता मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राज्यपाल कार्यालयाकडून अशी कोणतीही शिफारस केली नसल्याचा सांगून या वृत्ताचं खंडन केलं आहे. 

सोमवारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही शिवसेना-महाआघाडी यांच्या सत्तास्थापनेबाबत आशा काही नेत्यांना लागून राहिली होती. 

तत्पूर्वी शरद पवार यांनी संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. संजय राऊत हे शिवसेनेचे शिलेदार आहेत जे पूर्वीपासून शिवेसना-राष्ट्रवादी यांच्यातील दूवा म्हणून काम करत आहेत. संजय राऊत यांच्या मध्यस्थीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात ४५ मिनिटांची बैठक पार पडली. शिवसेनेला आघाडीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाकपिल सिब्बलअहमद पटेल