Join us  

Maharashtra CM: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मिळाली नवीन ओळख; आता म्हणणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 8:49 AM

राज्यातील या सत्तास्थापनेचा घोळ मुख्यमंत्रिपदावरुन झाला आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महायुतीच्या माध्यमातून शिवसेना-भाजपाने निवडणुका लढविल्या मात्र मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात पेच निर्माण झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा ही मागणी शिवसेनेने लावून धरली मात्र भाजपाने शिवसेनेची ही मागणी मान्य न करता वेळेप्रसंगी विरोधी बाकांवर बसणे पसंत केलं. 

राज्यातील या सत्तास्थापनेचा घोळ मुख्यमंत्रिपदावरुन झाला आहे. मागील ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्य कारभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार बनणार अशी अपेक्षा भाजपाला होती. मात्र शिवसेनेच्या मागणीमुळे भाजपाच्या सत्तास्थापनेचे स्वप्न भंगलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपाविला. त्यानंतर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना कारभार पाहण्यास सांगितले. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्रिपदही देवेंद्र फडणवीसांकडे राहिलं नाही. 

भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेच असणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र सत्तास्थापनेच्या घोळात ना कोणाचं सरकार बनलं ना कोणी मुख्यमंत्री झालं. त्यामुळे अखेर देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर स्वत:ची नवीन ओळख निर्माण केली आहे. ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला महाराष्ट्र सेवक म्हणून संबोधित केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसकडून चौकीदार चोर है असा प्रचार केला जात असताना भाजपाने नामी शक्कल शोधत मै भी चौकीदार मोहीम पुढे आणली होती. त्यानुसार पंतप्रधानांपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजपा नेत्यांनी नावापुढे चौकीदार शब्दाचा उल्लेख केला होता. 

दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेनामुख्यमंत्रीराष्ट्रपती राजवट