Join us  

Maharashtra Election 2019: मला सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या; राज ठाकरेंची 'मनसे' साद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 7:47 PM

खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जात आहे. या सर्व शहरांचा विचका झाला आहे.

मुंबई - राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, सत्तेतला आमदार काही करु शकत नाही, विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा. मी आज सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी मागणी होत आहे. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे. ईडी चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिलीच सभा सांताक्रुझ येथे पार पडली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जात आहे. या सर्व शहरांचा विचका झाला आहे. निवडणुका येतात जाहिरनामे देतात, आश्वासने देऊन दिवसेंदिवस शहर बरबाद करतायेत. पुण्यासारख्या शहरात अर्धा-पाऊणतास पाऊस पडल्याने सगळे विस्कळीत होत असेल तर काय करणार? पुण्यात नाही पाण्यात राहतो असं सांगा असं त्यांनी सांगितलं. 

तसेच शहरांचे नियोजन कोलमडलं, उमेदवार येणार मतदान करणार, वर्षोनुवर्षे सुरु आहे. गेल्या ५ वर्षात सरकारला जाब कोण विचारतंय? विरोधी पक्षनेतेच भाजपात गेले? विरोधी पक्ष राहिला आहे का? सरकारविरोधात तुमचे प्रश्न मांडणार कोण? ही विरोधी पक्षाची भूमिका बजावणार कोण? बँकांचे घोटाळे होतायेत, लोकं बँकांबाहेर जाऊन रडतायेत? अनेक व्हिडीओ त्याचे समोर येत आहेत? हक्काचे पैसे काढता येत नाही, पीएमसी बँकेच्या अधिकारपदावरील माणसं ही भाजपाशी निगडीत आहे असा आरोप राज यांनी केला. 

दरम्यान, शेतकरी, कामगार, महिला, तरुणांना नोकऱ्या नाहीत, दर ५ वर्षांनी यायचं तुमच्यासमोर घोषणा द्यायचा, जल्लोष करायचा मग संपलं, तुमच्यासमोर खडतर आयुष्य आहे, सरकार कसंही वागतात, या देशातील न्यायालयांमध्ये निर्णय मिळणार काही नाही? हा प्रश्न आहे. सरकार, न्यायालय संगतमताने वागायला लागले की, तुमचा आवाज कोण ऐकणार? वाहतूक कोंडी, रस्त्यावर खड्डे हे सगळं तुम्ही सहन करताय, तुमच्या जाणीवा मेल्या आहेत का? तुम्ही कधी प्रश्न विचारणार? जे तुम्ही बोललात ते झालं की नाही? ज्याचा रोजगार आहे त्याचा रोजगार जातो, जो बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळत नाही, महाराष्ट्र अधोगतीला जात आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019