Join us  

Maharashtra Election 2019: राम मंदिराच्या कारसेवकांना रोजगार द्या - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 2:39 AM

Maharashtra Election 2019: वाढवण बंदराच्या उभारणीलाही केला विरोध

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जे जे हात राम मंदिर उभारणीसाठी उठले, त्यांना रोजगार मिळवून देण्याबाबत मी केंद्र व राज्य सरकारकडे आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर, बोईसर, नालासोपारा, ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी घेतलेल्या सभांत ते बोलत होते.

वाढवण बंदराच्या उभारणीला शिवसेनेचा विरोध कायम आहे. बंदरविरोधी कृती समितीने दिवाळीनंतर माझ्या भेटीला यावे. त्यांना हवा तोच निर्णय घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. या बंदराबाबतची नाराजी व्यक्त करत स्थानिकांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे दुष्परिणाम सांगितल्यावर मी तो प्रकल्प होऊ देणार नाही, असे घोषित केल्याचा संदर्भ त्यांनी दिला.

विधानसभेच्या प्रचारापूर्वीच चोर की पोलीस असे पोस्टरयुद्ध पेटले होते. मी तुम्हाला पोलीस दिला आहे. त्याला निवडून आणा आणि चोराला असे पळवा की तो परत येता कामा नये, असे आवाहन त्यांनी नालासोपाऱ्यात केले आणि बहुजन विकास आघाडीच्या कारभारावर टीका त्यांनी केली.

भाजपच्या नेत्यांनी पाठ

शिवसेनेच्या प्रचारसभेकडे पालघर जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याने तिकीटवाटपावरून युतीत सुरू असलेली धुसफुस कायम असल्याचे दिसून आले. उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्याव्यतिरिक्त एकही पदाधिकारी, कार्यकर्ता या सभेला उपस्थित नव्हता.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019