Join us  

Maharashtra Election 2019 : भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 11:49 AM

घाटकोपरमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

ठळक मुद्देघाटकोपरमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. घाटकोपर पूर्वमधील भाजपाचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.प्रकाश मेहता यांचं तिकीट कापल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

मुंबई - घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भाजपचा बालेकिल्ला आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी येथून सलग सहा वेळा विजयाची पताका फडकविली आहे. यावेळी मेहता यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यानंतर आता घाटकोपरमध्ये भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. घाटकोपर पूर्वमधीलभाजपाचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.  

प्रकाश मेहता यांचं तिकीट कापल्याने भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मेहता यांच्याऐवजी पराग शाहांना उमेदवारी दिल्याने शुक्रवारी (4 ऑक्टोबर) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पराग शाह यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून ठेवली आहे. शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या या मतदारसंघात गुजराती भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी रस्ते, वाहतुकीची कोंडी या समस्या अनेक वर्षांपासून कायम असल्या, तरी या समाजाने तीन दशकांपासून भाजपाच्या झोळीत भरभरून मतदान केले आहे. 

1990 पासून प्रकाश मेहता यांना सातत्याने उमेदवारी दिली आहे. युती सरकारच्या दोन्ही कालखंडात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तुलनेत यावेळची कारकिर्द वादग्रस्त ठरली. गृहनिर्माणसारखे महत्त्वाचे खाते आणि ज्येष्ठ मंत्र्यांत समावेश असल्याने प्रतिमा उजळविण्यास मोठी संधी होती. मात्र, एसआरए प्रकल्प, इमारतीचा पुनर्विकास, नियमबाह्य दिली जाणारी परवानगी आणि त्यातील टक्केवारी याबाबत सातत्याने त्यांच्यावर आरोप होत राहिले. त्यामुळे मेहता नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिले. 

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी भाजपा नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपानं चौथ्या यादीत सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर दुसरीकडे राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तिकीट देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी इथूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची चर्चा आहे. काटोलमधून चरण सिंग ठाकूर, तुमसर- प्रदीप पडोले, नाशिक पूर्व- राहुल धिकले, बोरिवली- सुनील राणे, घाटकोपर पूर्व- पराग शाह, कुलाबा- राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.  

 

टॅग्स :प्रकाश मेहतामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019विधानसभा निवडणूक 2019घाटकोपर पूर्वभाजपा