Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 7:26 AM

'भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार ‘गोड बातमी’चे दाखले देत आहेत.

मुंबई -  मागच्या सत्तेचा वापर पुढच्या सत्तेसाठी ‘थैल्या’ ओतण्यात होत आहे, पण शेतकऱ्यांच्या हाती कुणी दमडा ठेवण्यास तयार नाही. म्हणूनच राज्यातील शेतकऱयांना शिवसेनेचे राज्य हवे आहे. हे आम्ही फक्त मुद्दय़ांचेच बोलत आहोत. कुणी गुद्दय़ांवर येणार असेल तर आम्ही त्यालाही उत्तर देऊ. गुंडांचा धाक व पैशांचा प्रसाद कोणी वाटणार असेल तर मर्द मरगट्टा मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. नैतिक मूल्यांवर जर राजकारण आधारले नाही तर अन्याय, भ्रष्टाचार आणि अत्याचार यांना राजकारणाचे संरक्षण मिळतच राहणार. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवून कुणालाही राज्य आणता येणार नाही. शिवसेना येथे तलवार घेऊन उभीच आहे असा गंभीर इशारा सामना अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे. 

'भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार ‘गोड बातमी’चे दाखले देत आहेत. आता ही ‘गोड बातमी’ म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे? अर्थात ‘गोड बातम्यां’चे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेल? हे प्रश्न आहेत असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे

  • आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे, ‘‘शिवसेनेचा’’ मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार व तसे भाग्य मऱ्हाटी जनतेच्या ललाटी लिहिले असेल तर ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणात नाही. कारण ही भाग्यरेषा भगवी आहे.
  • राज्यात ‘महायुती’चेच सरकार येईल, अशी गर्जना चंद्रकांतदादा पाटील वगैरे भाजप नेत्यांनी केली आहे. त्यांच्या तोंडात साखर पडो. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी ‘गोड’ बातमी मिळेल असा दावा केला आहे. प्रश्न इतकाच आहे की, ते सरकार नक्की कधी येईल व ही ‘महायुती’ की काय ती नक्की कुणाची व कशी, हे दादा वगैरे मंडळींनी सांगितले नाही. 
  • भारतीय जनता पक्ष ज्या ‘महायुती’चा विचार करीत आहे ती आकाराने मोठी असली तरी त्यात सामावलेल्या अनेकांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आलेला नाही. हे सर्व बिन आमदारांचे ‘महामंडळ’ही परवा राज्यपालांना भेटले व त्यांनी सरकार स्थापनेबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता राज्याची नसून पुढील सरकारात आपले स्थान काय, यावर जास्त आहे. 
  • हे बिन आमदारांचे महामंडळ उद्या दुसरे एखादे सरकार येईल तेव्हा मागचे सर्व विसरून नव्या सरकारात सामील झालेले असेल. ‘मावळते’ अनेक मंत्री चिंतेत आहेत. त्यांनाही चिंता आपल्या सरकारी गाडी, घोडा, बंगला जाण्याची आहे. त्यांची धाकधूक वाढली आहे 
  • ज्याच्याकडे गणित असेल त्याने सरकारही बनवावे आणि मुख्यमंत्रीही बनवावा, हे आमचेही मत आहे. पण भ्रष्टाचार आणि अत्याचार करून कोणी राजकारण करणार असेल व औटघटकेच्या सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असेल तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही. बाटगा जोरात बांग देत असतो असा काहीसा प्रकार सत्तास्थापनेच्या निमित्ताने सुरू झाला आहे. 
  • ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी, हिंदुत्व वगैरे विचारधारेशी काडीचा संबंध नाही असे काही ‘बाटगे’ नव्या आमदारांशी संपर्क करून ‘थैली’ची भाषा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. हे सर्व मुख्यमंत्री किंवा भाजप नेत्यांच्या आशीर्वादानेच घडत आहे, असा आमचा दावा नाही. 
  • हे तथाकथित वाल्मीकी जणू राज्य स्थापनेची जबाबदारी आपल्यावरच असल्याच्या थाटात पुढच्या सरकारचे हवाले देत बाटवाबाटवी करीत आहेत. ही राजकीय झुंडशाही महाराष्ट्राच्या, शिवरायांच्या परंपरेस शोभणारी नाही. सरकार स्थापन व्हावे व ते महाराष्ट्राच्या थोर पुरोगामी परंपरेच्या मार्गावरून व्हावे. 
  • दिल्लीत अहमद पटेल व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गुप्त भेट झाली. त्यात काही वेगळी खलबत झाली असे ‘मीडिया’ने वृत्त पसरवले आहे. उद्या गडकरी व अन्य पुढाऱयांच्या भेटीगाठी झाल्या तरी महाराष्ट्राचे पानही सळसळणार नाही. कारण बुंधा आणि फांद्या मजबूत आहेत. 
  • आता ही ‘गोड बातमी’ म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे? त्यासाठी ते लाडवाची की बासुंदीची  जेवणावळ देणार आहेत. शेवटी आपल्याकडे गोड बातमीचा संबंध लग्न किंवा बारसे याच्याशीच जोडला जातो. अर्थात ‘गोड बातम्यां’चे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेल? हे प्रश्न आहेतच. 
  • ‘भारतीय जनता पक्ष चर्चेचा दरवाजा बंद करून बसलेला नाही’ हे वाक्य सध्या फेकले जात आहे. आम्हीही दरवाजे, खिडक्या उघडय़ाच ठेवल्या आहेत व हवा खेळती ठेवली आहे इतकेच. फक्त हवेबरोबर कीटक आत येऊ नयेत याची पक्की तजवीज करून ठेवली आहे. 
  • घर आमचेही आहे व ते पक्के सागवानी, शिसवी लाकडाचे तसेच छत, भिंती मजबूत असलेले आहे. पैपाहुण्यांच्या चपलांचा ढिगारा आजही आमच्या दाराबाहेर आहे. हीच शिवसेनेची श्रीमंती म्हणायला हवी. आम्ही कुणाचे वाईट चिंतीत नाही; पण चिंता आहे ती राज्याची व शेतकऱ्यांची 

 

टॅग्स :शिवसेनाभाजपामुख्यमंत्री