Join us

Maharashtra Election 2019 : हाती शिवबंधन बांधून अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 00:17 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद  यांनी आज हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद  यांनी आज हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. आज रात्री मातोश्री निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी दीपाली सय्यद यांच्या हाती शिवबंधन बांधले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. दीपाली सय्यद या मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार असतील. याबाबतची अधिकृत घोषणा याबाबत लवकरच घोषणा होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी तगड्या उमेदवाराचा शोध शिवसेनेकडून सुरू होता. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून गेल्या सलग दोन निवडणुकांत जितेंद्र आव्हाड यांनी विजयी पताका रोवली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखली होती. परंतु, तरीदेखील शिवसेना यात यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता शिवसेना कोण उमेदवार देणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेचा उमेदवार अंतिम झालेला नव्हता. तरीही, शिवसेनेतून प्रदीप जंगम, राजेंद्र साप्ते, सुधीर भगत आदींची नावे आघाडीवर आली होती. त्यानंतर, पुन्हा मुंब्य्रातून अन्वर कच्ची आणि आता रविकांत पाटील यांचीही नावे आघाडीवर आली होती. उमेदवारी मिळविण्यासाठी यांच्यात रस्सीखेच सुरू असताना दीपाली सय्यद या मराठी सिनेअभिनेत्रीचे नाव चर्चेत आले.

 प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या दीपाली सय्यद यांनी साकळाई जलसिंचन योजना मार्गी लागावी यासाठी नगरमध्ये उपोषण केले होते. त्यावेळी दीपाली यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तारकांनी शनिवारी हजेरी लावली होती. नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना मार्गी लागावी यासाठी दीपाली सय्यद यांनी शुक्रवारपासून जिल्हा परिषद आवारात उपोषण सुरू केले होते. तेव्हापासूनच त्यांचा राजकारणात सक्रीय सहभाग होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, कुठल्या पक्षात याबाबत निश्चित माहिती नव्हती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना ठाण्यात शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार हेही उपस्थित होते.  

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनामुंब्रा कलवा