Join us

महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 08:01 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टीव्ही शो केला होता. आता पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.

मुंबई : ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारशाचे वाहक आहोत. आपण कोण आहोत हे समजून, आपल्याला काय घडवायचे आहे ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारपासून ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. सुप्रसिद्ध विचारवंत आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी ही मुलाखत  घेतली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ ते १९ या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टीव्ही शो केला होता. आता पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायापर्यंत विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. छत्रपती शिवरायांच्या शौर्याबाबतही त्यांनी उहापोह केला आहे.

रामायण महाभारतापासून महाराष्ट्र ही देवभूमी

राम वनवासात होते त्यावेळी ज्या  दंडकारण्याचा उल्लेख येतो ते विदर्भ ते नाशिक-पंचवटीपर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन धान्यस्थ बसले होते, असे लोककथांमध्ये सांगितले जाते.

रुक्मिणीचे कौंडिण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सुटका, त्यासाठीचे युद्धदेखील विदर्भाच्याच भूमीत घडले. पांडव अज्ञातवासात राहिले, ते चिखलदऱ्यात.

भगवान बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रूपाने पोहोचले. अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये भिक्खूंनी त्यांच्या कथा कोरल्या, असे मुख्यमंत्री पॉडकास्टमध्ये म्हणाले.

महाराष्ट्रधर्म ही जिवंत मूल्यसंहिता

मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रधर्म ही एक जिवंत मूल्यसंहिता आहे. ती सांगते विवेकाने विचार करा, सेवाभावाने वागा आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती पुढे सरकत राहिली.’  

वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती 

तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. आपली वारी ही चालती-बोलती संस्कृती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

शौर्याचीही परंपरा 

शिवराय देव-देश, धर्मासाठी लढले. छत्रपती संभाजी महाराजांनीही कवी, योद्धा, विद्वान म्हणून स्वराज्य व  धर्माचे रक्षण केले. थोरले बाजीराव पेशवे यांनीही पराक्रम गाजवला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शौर्यगाथा सांगितली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपा