मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिवसेनेच्या आजी-माजी खासदार आणि आमदारांसोबत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभेला महायुती जशी जिंकली, त्याच ताकदीने मुंबई महापालिका कामाच्या जोरावर आम्ही जिंकू, असे म्हणत मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागा जशा महायुतीने जिंकल्या आहेत, त्याप्रमाणेच मुंबई महापालिकेतील जागाही जिंकेल असा संकल्प महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मुंबईमध्ये जे काही काम आम्ही महायुतीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात केलं आहे. जसं की, खड्डे मुक्त मुंबई, क्रॉकीटचे रस्ते, प्रदूषण मुक्त मुंबई, आरोग्यावर आम्ही फोकस केला आहे. याशिवाय डीप क्लीन ड्राईव्ह, सुशोभिकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे दवाखान, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात सुरू केलेल्या योजना, जसं की औषध विनामूल्य देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
याचबरोबर, बंद पडलेले प्रकल्प सुरू करून पुढे नेण्याचे काम केलेलं आहे. हा जो काही विकासाचा भाग आहे, तो गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ज्यांची सत्ता होती, त्यांनी ती कामे करायला हवी होती. परंतु दुर्दैवाने ती झाली नाही. मात्र आमचे सरकार आल्यावर अडीच वर्षांमध्ये आम्ही मुंबईमध्ये आमुलाग्र बदल झाला पाहिजे, यासाठी निर्णय घेतले. महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय आहे. मुंबईच्या विकास हा आमचा अजेंडा आहे. मुंबईतील खड्ड्यांचा प्रवास टाळण्यासाठी दोन फेजमध्ये आम्ही निर्णय घेतले. यामध्ये मेट्रोची, कोस्टल, अटल सेतू ही काम लोक पाहत आहेत. सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले आहे की, मुंबई एक फिनटेक कॅपिटल झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू असून मुंबई खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहेच, पण मुंबई हे देशाच पावर हाऊस होणं गरजेचं आहे. राज् यसरकार आणि केंद्र सरकार आपलं आहे, पण या सर्व गोष्टी करायच्या असतील तर महापालिकेत देखील महायुतीची सत्ता असणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल. मुंबईकरांना अपेक्षित जी मुंबई आहे, ती देण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल. म्हणून त्याची जी काही तयारी आहे, त्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.