India's got latent: कॉमेडियन समय रैना याच्या स्टँड-अप कॉमेडी शो 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांसंदर्भात अश्लील विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून सोशल मीडियावर जोरदार टीका होतं होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सायबर सेलने मोठी कारवाई केली आहे. या शोमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व कलाकारांविरोधात महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.
लोकप्रिय यूट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह विधानामुळे वादात सापडला आहे. या प्रकरणी रणवीरसह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि इतर सहकाऱ्यांना त्यांच्या असभ्य वक्तव्याबद्दल समन्स बजावले आहे. १७ फेब्रुवारीला याप्रकरणी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणात आता ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्वांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली आहे.
"महाराष्ट्र सायबर सेलने 'इंडियाज गॉट लेटेंट' या युट्यूब शोविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकूण ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोच्या पहिल्या भागापासून ते सहाव्या भागापर्यंत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाईल," अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलने दिली आहे.
सायबर विभागाने ३० ते ४० कलाकारांना चौकशीसाठी बोलावले असून त्यांच्याविरोधात सायबर कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यूट्यूबर्सनी केलेल्या अपमानास्पद आणि वर्णद्वेषी टिप्पण्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. रणवीर अलाहाबदिया, समय रैना, अपूर्व मखिजा, जसप्रीत सिंग आणि आशिष चंचलानी तसेच शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांच्यासह सामग्री निर्मात्यांनी केलेल्या अपमानास्पद आणि अयोग्य टिप्पण्यांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.