Join us  

...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:38 AM

जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे.

मुंबई- राज्यात सेना-भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोघांचंही घोडं अडलं. आता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत आहेत. शरद पवार यांच्याकडे काल झालेल्या साडेतीन तास चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेबरोबर जाण्यासंदर्भात सूचक विधान केलं. जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे. त्यावर आमची चर्चा सुरू आहे. आज आम्ही मुंबईतही जाणार आहोत. आपण सर्वजण राज्य घटनेला मानतो. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला मानतो. त्यात वेगळा आग्रह असण्याचं कारण नाही. चर्चेच्या गोष्टी आम्ही आणखी पुढे नेतोय, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी शिवसेनेसोबतच्या संभाव्य सरकार स्थापनेवर भाष्य केलं आहे. दुसरीकडे, काल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र रात्रभरातच चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल.शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 14 व काँग्रेसचे 12 मंत्री असतील, अशी शक्यता आहे. शिवसेनेला पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. पण राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना शुक्रवारी पॅन, आधार कार्ड, आदी पुराव्यासह मुंबईत बोलावले आहे. त्यांना तीन-चार दिवस राहण्याच्या तयारीने येण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा होताच राज्यपालांना भेटण्याचा शिवसेनेचा इरादा असल्याचे समजते.  

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019बाळासाहेब थोरात