Join us  

Maharashtra CM: कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाहीच - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 6:10 AM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कामे सध्या सुरू आहेत.

मुंबई : समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे व नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांसह कोणतेही पायाभूत सुविधा प्रकल्प रद्द करण्यात येणार नाहीत वा त्यांना स्थगिती दिली जाणार नाही. ती कामे गतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. या प्रकल्पांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत आढावा घेतला.बुलेट ट्रेनला स्थगिती दिल्याचा त्यांनी इन्कार करून ते म्हणाले की, आरेच्या कारशेडखेरीज अन्य कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाहीे. मात्र बुलेट ट्रेनबाबत आढावा घेऊन विचार करू. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकास प्रकल्पांना नवे सरकार स्थगिती देईल, अशी चर्चा गेले काही दिवस होती.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कामे सध्या सुरू आहेत. त्यांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या मंत्र्यांसह मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, असे ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की पायाभूत सुविधांच्या कामांआड आम्ही येणार नाही. मात्र, उपलब्ध निधी, त्याचा विनियोग व स्थानिकांना होणारा लाभ या बाबींचा विचार करून या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे.प्रशासन तळमळीने काम करते. मात्र, कामांची प्रगती व निधी यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या कारशेडच्या उभारणीत स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेऊ .विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पाऊलांचा धोका ओढावून घेतोय का,याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.कोरेगाव-भीमाबाबत आधीचेच आदेशपुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेले व गंभीर स्वरुपाचे नसलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश आधीच्या सरकारने दिलेले होते. त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्यास मी प्रशासनाला सांगितले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी गेल्या दोन दिवसात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र