Join us  

Maharashtra CM: 'राजकीय भुकंपाने मी हललोय, मला एक दिवसाची सुट्टी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 9:37 PM

चंद्रपूर येथील एका शिक्षकाने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून मी अस्वस्थ झाल्याचं म्हटलंय.

मुंबई -  राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. तसाच धक्का एका शिक्षकालाही बसला आहे. त्यामुळे या शिक्षकाने थेट रजेचा अर्जच प्राचार्यांना पाठवला. 

चंद्रपूर येथील एका शिक्षकाने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून मी अस्वस्थ झाल्याचं म्हटलंय. राज्यातील राजकारणात झालेल्या भुकंपामुळे मी पार हललेलो आहे. त्यामुळे त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मला एक दिवसाची सुट्टी हवी आहे, असा अर्ज शिक्षक जहीर एस सैय्यद यांनी केला आहे. जहीर यांना राजकीय घडामोडीचा धक्का बसला असून ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाने प्राचार्यांना सुट्टीसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे राज्यातील राजकीय भुकंपाचा धक्का बसला असून मी हदरलो आहे. त्यामुळे मला 23 नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी मिळावी, असे म्हणत जहीर सैय्यद यांनी प्राचार्यांकडे रजेचा अर्ज केला. मात्र, प्राचार्यांनी रजा नामंजूर असे म्हणत तो अर्ज फेटाळून लावला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीच्या सरकारचं राजकीय नाट्य पाहून महाराष्ट्रातील अनेकांना धक्का बसला आहे. सकाळी सकाळी पेपर हातात घेण्यापूर्वीच आजचा पेपर रद्दी बनल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याचा क्षण महाराष्ट्रासाठी धक्कादायक होता. या घटनेनंतर राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. त्यात, एका शिक्षकाने केलेला रजेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, अनेकांनी हसून हसून काहीशी आपलीही परिस्थीती अशीच झाल्याचं म्हटलंय. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअजित पवारराजकारणचंद्रपूरशिक्षक