Join us  

Maharashtra CM: महाविकास आघाडीचं सरकार कसं आलं?; अखेर राऊतांनी सांगितली 'अंदर की बात' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 9:29 AM

तसेच शरद पवार व काँग्रेस एकत्र होतेच, त्यात शिवसेनाही सामील झाली.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे राज्य महाराष्ट्रात कसे आले नाही? यापेक्षा तीन पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा आला ते समजून घेतले पाहिजे. 24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या काळात एक 80 तासांचे सरकार आले व गेले. त्या औटघटकेच्या सरकारचे पुसटसे स्मरणही कुणाला नाही. या सर्व खेळात राजभवनाची भूमिका ‘खलनायकी’ ठरली असं संजय राऊतांनी सांगितले. 

यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी व्यक्तिशः चांगले ओळखतो. ते एक सज्जन गृहस्थ आहेत. राजभवनात जाऊन त्यांना भेटलो. कोश्यारी यांनी तेव्हा स्पष्ट सांगितले, ‘‘मी घटनेला बांधील आहे. घटनेची चौकट मोडून मी काही करणार नाही. राजभवनातून बदनाम होऊन मी जाणार नाही,’’ असे सांगणाऱ्या राज्यपालांनी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना घाईघाईत शपथ दिली व अजित पवार यांनी दिलेल्या आमदारांच्या सह्या मान्य करून त्यांनी पुढचे सर्व प्रकरण घडवले. त्यात राजभवनापेक्षा ‘वरचा आदेश’ महत्त्वाचा ठरला असा आरोप त्यांनी केला. 

गृहमंत्रालयाचा हस्तक्षेप झाला हे मान्य करावे लागेल. अजित पवार यांचे राजकारण अवसानघातकी व धोक्याचे असे ज्यांना वाटते त्यांनी एक समजून घेतले पाहिजे अजित पवार फडणवीसांना जाऊन मिळाले म्हणून तीन पक्षांची आघाडी अधिक घट्ट झाली. अजित पवारांमुळे फडणवीसांचे फोडाफोडीचे भ्रष्ट राजकारण लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरले. एक दबाव आमदारांवर निर्माण झाला व सर्वच आमदार शेवटी शरद पवारांकडे परतले व शेवटी एकाकी राहिलेल्या अजित पवारांनाही मागे फिरावे लागले असं सांगत अजित पवारांच्या बंडामुळे भाजपाचा चेहरा समोर आला असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. 

तसेच शरद पवार व काँग्रेस एकत्र होतेच, त्यात शिवसेनाही सामील झाली. शरद पवार यांनी पुढाकार घेतला नसता तर महाराष्ट्रात आजचे परिवर्तन झाले नसते. अशा प्रकारचे एखादे सरकार निर्माण होऊ शकते यावर सुरुवातीला शरद पवारही विश्वास ठेवायला तयार नव्हते. शरद पवार प्रथम सोनिया गांधी यांना भेटले तेव्हा सोनिया गांधी यांनीही हा प्रस्ताव मान्य केला नाही. शिवसेनेबरोबर कसे जायचे? हा त्यांचा पहिला प्रश्न व अल्पसंख्याक तसेच हिंदी भाषिक पट्टय़ात काय प्रतिक्रिया होईल? ही शंका त्यांनी व्यक्त केली असा खुलासा संजय राऊतांनी केला. 

त्यानंतर शरद पवार यांनी सोनियांना सांगितले, बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधी यांचे संबंध सलोख्याचे होते. आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले नाहीत. प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी या राष्ट्रपतीपदाच्या ‘काँग्रेजी’ उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून आपण स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. मुंबईतला हिंदी भाषिक शिवसेनेला मतदान करतो म्हणून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येत राहिली अशी माहिती पवार यांनी सोनियांना दिली. काँग्रेस पक्ष आजही ‘राज्यकर्त्या’ वतनदारांच्या भूमिकेत आहे. ‘राष्ट्रीय’ राजकारणावर काय परिणाम होईल? या चिंतेत काँग्रेसने एक महिना घालवला, पण महाराष्ट्रासारखे राज्य भाजपच्या हाती राहू नये यावर शेवटी पक्षातच एकमत झाले असं राऊत सांगतात.  

टॅग्स :सोनिया गांधीशरद पवारउद्धव ठाकरेसंजय राऊत