मुंबईनजीक उभारणार वेलनेस सेंटर; अर्थसंकल्पामध्ये ताण-तणावमुक्तीसाठी महत्वाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 05:25 IST2026-03-07T05:25:29+5:302026-03-07T05:25:38+5:30
Maharashtra Budget 2026 Marathi: भारतीय योग, कला, संगीत आणि संस्कृती यांचा अनोखा संगम या केंद्रामध्ये असेल. भारतीय उपचार पद्धती, तणावमुक्तीसाठी वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपचार पद्धती याठिकाणी असतील.

मुंबईनजीक उभारणार वेलनेस सेंटर; अर्थसंकल्पामध्ये ताण-तणावमुक्तीसाठी महत्वाची घोषणा
मुंबई : ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना त्यापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक अभिनव असे उत्कृष्टता केंद्र (वेलनेस सेंटर) मुंबईनजीक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना केली.
भारतीय योग, कला, संगीत आणि संस्कृती यांचा अनोखा संगम या केंद्रामध्ये असेल. भारतीय उपचार पद्धती, तणावमुक्तीसाठी वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या भारतीय उपचार पद्धती याठिकाणी असतील. ध्यान, प्राणायाम, नाद चिकित्सा, संगीत चिकित्सा यावर आधारित उपचारांचाही समावेश असेल.
भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित तणावमुक्ती, मानसिक संतुलन आणि सर्वांगीण आरोग्य संवर्धनासाठी संशोधन यावरही भर देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षणही केंद्रात देण्यात येणार आहे.
२१ जलमार्गांवर २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण
विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण व ११ नव्या जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महामुंबईसाठी काय?
महामुंबईत २० लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, तर १० लाख परवडणारी घरे
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण
अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई’, तर वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’
उत्तन ते विरारदरम्यान ५८ हजार ७५४ कोटी खर्चून सागरी सेतू उभारणार
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ साठी
२२,८६२ कोटींची तरतूद
अटल सेतू ते मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण; १ हजार १०२ कोटींची तरतूद
६,६०० कोटी खर्चून ३४० किमी पर्यंत जलमार्ग वाढवणार
विद्यमान २१ जलमार्गांवरील
२० टर्मिनल्सचे आधुनिकीकरण
सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्य बंदर विकसित करणार