मनोहर कुंभेजकर, मुंबई-मुंबईत मासेमारीत वेसावे हा मोठा कोळीवाडा आहे.आज सर्वत्र गगनचुंबी इमारती व काँक्रिटचे जंगल उभे राहत असतांना अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून सुमारे सश किमी अंतरावर वेसावे हा पुरातन कोळीवाडा आहे.त्यांनी आपले गावपण,संस्कृती व परंपरा जतन केली आहे.तर देशाच्या स्वातंत्र्य लढयात येथील ११४ स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता. उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदान केंद्रात खास कोळीवाड्याची थीम उभारली आहे.
वेसावे,यारी रोड येथील महापालिकेच्या उच्च माध्यमिक शाळेत खास येथील मतदान केंद्रात कोळीवाड्यातील घरे,त्यांच्या मासेमारी बोटी आणि मासेमारी व्यवसाय,मासेमारी ला लागणारी साधने,कोळी समाजाचे आदरातिथ्य व त्यांची संस्कृती यांचे दर्शन घडवणारा देखावा साकारला आहे.
येथील निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी व वेसावे कोळीवाड्यात गोमा गल्लीत राहणाऱ्याउर्मिला कोमरे यांनी ही संकल्पना राबवली.
या मतदान केंद्रात वेसावे कोळीवाडयातील कोळी समाजाचे सुमारे ८० टक्के मतदान आहे.त्यामुळे त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आणि पोषक वातावरणात त्यांनी मतदान करावे यासाठी मतदान केंद्रात कोळीवाड्याची थीम उभारल्याची माहिती सुभाष काकडे यांनी दिली.