Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबाला ‘ती’ मदत नाही; मदत पुनर्वसनमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:35 IST2025-07-05T10:34:42+5:302025-07-05T10:35:27+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या संदर्भात शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात राज्य सरकारने ही माहिती दिली.

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकरी आत्महत्येनंतर कुटुंबाला ‘ती’ मदत नाही; मदत पुनर्वसनमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या वारसांना मिळणाऱ्या मदतीच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वाढीव मदत देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन नसल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या संदर्भात शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात राज्य सरकारने ही माहिती दिली.
मराठवाडा आणि विदर्भात मार्च २०२५ दरम्यान २५० शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी १०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निकषानुसार आर्थिक मदत आली आहे. ६३ प्रकरणे अपात्र ठरली आहे तर ८६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे. तर एप्रिल २०२५ दरम्यान २२९ शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ७४ प्रकरणे पात्र ठरली आहेत. तर ३१ प्रकरणे आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. १२४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
अधिकृत कर्ज आणि कर्जबाजारी हाच निकष
नापिकी, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँका किंवा मान्यताप्राप्त सावकारकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारा कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या झाल्यास पात्र प्रकरणी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृत व्यक्तीला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियाना मदत देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी प्रश्न केला होता. त्यावर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना वाढीव मदत देण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही असे लेखी उत्तरात नमूद केले आहे.